“..म्हणून इंडिया आघाडी सोबतच राहणार” पंजाबमधील स्वबळाच्या घोषणेनंतर आपने स्पष्ट केली भूमिका

नवी दिल्ली – पंजाबमध्ये स्वबळावर लढण्याच्या निर्णयाचे आपने समर्थन केले आहे. त्याचवेळी इंडिया आघाडी समवेतच असल्याची ग्वाही देताना कॉंग्रेसला लवकरात लवकर जागावाटप उरकण्याचे आवाहन केले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पुढील पंधरवड्यात पंजाबमधील लोकसभेच्या सर्व जागांवरील उमेदवार जाहीर करण्याची घोषणा केली. त्याकडे इंडियासाठी आणखी एक हादरा म्हणून पाहिले गेले.
एवढेच नव्हे तर, ती आघाडी विखुरण्याच्या स्थितीत असल्याचे विश्लेषणही सुरू झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर, आपने एक निवेदन जारी करून भूमिका मांडली.
आप आणि कॉंग्रेसच्या पंजाबमधील प्रदेश शाखांनी स्वतंत्रपणे लढण्याचा आग्रह धरला आहे. त्या भावनेचा मान राखण्याचा निर्णय आम्ही घेतला. इतर राज्यांमधील जागावाटपासंदर्भात चर्चा सुरू आहे. त्या चर्चेला कॉंग्रेस लवकर अंतिम रूप देईल अशी आशा वाटते. भाजपचा पराभव हे इंडियाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे आम्ही त्या आघाडी समवेतच आहोत, असे आपच्या निवेदनात नमूद करण्यात आले. दिल्ली, गुजरात, गोवा आणि हरियाणात कॉंग्रेसशी जागावाटपाचा समझोता करण्यास आप उत्सुक आहे.





