ठाकरे बंधुंच्या युतीनंतर जल्लोष अन् आज थेट भाजपात प्रवेश; पक्षप्रवेशाला देवयानी फरांदेंचा विरोध

Devyani Pharande | राज्यातील महानगरपालिका निवडणुकीआधी भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे. नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये राज ठाकरेंचे माजी महापौर यतीन वाघ आणि उद्धव ठाकरेंचे माजी महापौर विनायक पांडे तसेच कॉंग्रेसचे शाहू खैरे हे आज भाजपत प्रवेश करणार आहेत.
ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर जल्लोष करणारे माजी महापौर विनायक पांडे हे भाजपच्या गळाला लागले आहेत. मात्र या पक्षप्रवेशाला देवयानी फरांदे यांनी जाहीर दर्शवला आहे. नाशिकमध्ये आज प्रभाग 13 मध्ये होणाऱ्या भाजप प्रवेशाला स्थानिक भाजप पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांकडून विरोध दर्शवला जात आहे. जुन्या कार्यकर्त्यांना डावलून दुसऱ्या पक्षातून येणाऱ्यांना झुकते माप दिले जात असल्याची भावना देवयानी फरांदे यांनी व्यक्त केली आहे.
“प्रभाग क्रमांक १३ मध्ये होणाऱ्या आजच्या प्रवेशाला माझा स्पष्ट विरोध आहे. तसेच प्रस्थापितांच्या विरोधात ठामपणे लढा देणाऱ्या हिंदुत्ववादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मी खंबीरपणे पाठीशी आहे. सदर विषयाबाबत निवडणूक प्रमुख म्हणून मला कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाही.”
जय श्री राम… pic.twitter.com/Qv2bp7mzzt— MLA Devyani Pharande (@PharandeDevyani) December 25, 2025
फरांदे यांची सोशल मीडिया पोस्ट
फरांदे यांनी त्यांच्या सोशल मिडीयावर पोस्ट लिहून आज होत असलेल्या पक्षप्रवेशाला विरोध दर्शवला आहे. “प्रभाग क्रमांक १३ मध्ये होणाऱ्या आजच्या प्रवेशाला माझा स्पष्ट विरोध आहे. तसेच प्रस्थापितांच्या विरोधात ठामपणे लढा देणाऱ्या हिंदुत्ववादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मी खंबीरपणे पाठीशी आहे. सदर विषयाबाबत निवडणूक प्रमुख म्हणून मला कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाही,” असं फरांदेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. देवयानी फरांदे यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी या पक्ष प्रवेशाला विरोध करण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.
विनायक पांडेंची नाराजी
गेल्या ४३ वर्षांपासून शिवसैनिक असलेल्या विनायक पांडे यांनी राजीनामा दिला आहे. मुलाच्या उमेदवारीवरून ते नाराज होते. “शिवसेना सोडताना दुःख होत आहे, पण तिथे सन्मान राहिला नाही. मागच्या निवडणुकीत तिकिटाच्या वेळी माझ्या मुलाचे तिकीट कापले. आता पुन्हा मुलाला तिकिटची मागणी केली होती. मुलाने मतदारसंघात कामही सुरू केले, पण यंदा ही तिकीट कापले. आता आम्ही सूनबाईला निवडणुकीत उतरवत आहोत, भाजपमधून ही उमेदवारी देण्यात आली आहे.संजय राऊत यांच्यासोबत मी फोनवर चर्चा केली. पण त्यांनी तिकीटाबाबतीत ठोस सांगितले नाही. ठाकरे यांच्यावर नाराजी नाही. पण स्थानिक पदाधिकारी यांच्याकडून डावलले गेले होते, आताही तसेच होत होते, त्यामुळे आम्ही निर्णय घेतला आहे,” असं विनायक पांडेंनी पक्ष सोडताना सांगितले. Devyani Pharande |
हेही वाचा:





