नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पाठोपाठ त्यांचे पुत्र राहुल यांच्या विरोधातही हक्कभंगाची नोटीस देण्यात आली आहे. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे संबंधित नोटीस सादर केली. राहुल यांनी सोमवारी लोकसभेत भाषण केले. त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर खोटे दावे केल्याची भूमिका दुबे यांनी घेतली आहे. राहुल यांनी एकप्रकारे बदनामीची मोहीम राबवली. त्यातून त्यांनी देशालाच टवाळीचा विषय बनवण्याचा प्रयत्न केला. त्यांची कृती आपल्या प्रजासत्ताकाची प्रतिष्ठा कमी करणारी आहे. निराधार आरोप करत असल्याबद्दल त्यांच्या विरोधात हक्कभंगाची प्रक्रिया सुरू केली जावी, अशी मागणी दुबे यांनी केली आहे.