DK Sivakumar : सिद्धारामय्यांनंतर ‘डीके शिवकुमार’ पर्वाची सुरुवात? संभाव्य मंत्रिमंडळाची यादी आली समोर
DK Sivakumar : आज होणारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत नव्या विधिमंडळ पक्षनेत्याची निवड होणार असून डीके शिवकुमार यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.

DK Sivakumar : कर्नाटकच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला असून, सिद्धारामैय्या यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या सरकार स्थापनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सिद्धारामय्या यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन होण्याचे संकेत मिळत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, डीके शिवकुमार यांनी राज्यपालांची भेट घेतली असून सरकार स्थापनेबाबत चर्चा केली आहे. आज होणारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत नव्या विधिमंडळ पक्षनेत्याची निवड होणार असून डीके शिवकुमार यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.
दरम्यान, नव्या मंत्रिमंडळात अनुभवी नेत्यांसोबत युवा आणि प्रादेशिक संतुलन साधण्यावर काँग्रेसचा भर असणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. संभाव्य मंत्रिमंडळात यतीन सिद्धारामय्या, दिनेश गुंडू राव, लक्ष्मी हेब्बाळकर, रामलिंगा रेड्डी, रिजवान अरशद, यू.टी. खादर, शरथ बाचेगौडा, ए.एस. पोन्नन्ना आणि बायराथी सुरेश यांसारख्या नेत्यांची नावे चर्चेत आहेत.
याशिवाय प्रियांक खरगे, एम.बी. पाटील, जी. परमेश्वर, कृष्णा बायरेगौडा, ईश्वर खंड्रे, के.जे. जॉर्ज, एच.सी. महादेवप्पा आणि संतोष लाड यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आज सायंकाळी चार वाजता होणाऱ्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सर्व आमदार, विधानपरिषद सदस्य, लोकसभा आणि राज्यसभा खासदार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीचे अध्यक्षस्थान सिद्धारामय्या भूषवणार असून काँग्रेसचे कर्नाटक प्रभारी रणदीप सिंह सुरजेवाला आणि पक्षाचे वरिष्ठ नेतेही उपस्थित राहतील.
डीके शिवकुमार यांची विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड झाल्यास त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग अधिकृतपणे मोकळा होणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : Manoj Jarange : उपोषण सुरू होताच सरकार ॲक्शन मोडमध्ये! मनोज जरांगेंना 5 मोठी आश्वासन, उपोषण मागे घेणार?





