प्रियांका गांधी यांची भेट घेतल्यानंतर राऊत म्हणतात की.. कॉंग्रेस आणि शिवसेनेत..

नवी दिल्ली –शिवसेना नेते संजय राऊत यांनी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पाठोपाठ बुधवारी त्या पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची भेट घेतली. त्या भेटींमुळे कॉंग्रेस आणि शिवसेनेतील जवळीक वाढत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
राऊत यांनी मंगळवारी राहुल यांची भेट घेतली. त्या भेटीत राऊत यांनी विरोधकांची देशव्यापी आघाडी स्थापन करण्यासाठी कॉंग्रेसने पुढाकार घेण्याची भूमिका मांडली. त्यानंतर त्यांनी प्रियंका यांच्याशी तासभर चर्चा केली. उत्तरप्रदेश आणि गोवा या राज्यांत लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत.
त्या निवडणुकांत दोन्ही पक्षांनी हातमिळवणी करण्याचा मुद्दाही चर्चेला आल्याचे समजते. शिवसेना इतर राज्यांतही विस्तारण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे राऊत यांच्या भेटीगाठींचे महत्व वाढले आहे. कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीचा (यूपीए) घटक बनण्यास शिवसेना उत्सुक असल्याची चर्चा काही दिवसांपासून आहे. मात्र, त्या मुद्द्यावर राऊत यांच्या भेटींमध्ये चर्चा झाली का, ते अद्याप समजू शकलेले नाही.





