CNG Price Hike : पेट्रोल-डिझेलनंतर आता CNGचाही झटका! पुणे आणि नाशिकमध्ये नवी दरवाढ लागू
CNG Price Hike : काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्येही सीएनजीचे दर वाढवण्यात आले होते. त्यानंतर महाराष्ट्रातही दरवाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती आणि अखेर ती खरी ठरली.

CNG Price Hike : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असतानाच आता सीएनजी वाहनधारकांनाही महागाईचा मोठा फटका बसला आहे. पुण्यात गुरुवारी सकाळपासून सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 2.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात सीएनजीचा नवा दर 94.85 रुपये प्रति किलो इतका झाला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव आणि हिंजवडी परिसरातील सर्व पेट्रोल पंपांवर हे नवे दर लागू झाले आहेत.
याशिवाय नाशिकमध्येही सीएनजीच्या दरात 1 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता पेट्रोल-डिझेलप्रमाणेच सीएनजी वाहनचालकांनाही वाढत्या इंधनदरांचा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. कमी खर्चिक आणि पर्यावरणपूरक पर्याय म्हणून गेल्या काही वर्षांत अनेकांनी सीएनजी वाहनांचा पर्याय स्वीकारला होता. मात्र आता सीएनजीही महागाईच्या विळख्यात सापडल्याचे चित्र दिसत आहे.
हेही वाचा : Devendra Fadnavis : शिंदेसेनेला धक्का! ‘मातोश्री’वरून मध्यरात्री फडणवीसांना फोन; नेमकं काय घडलं?
दरवाढ का?
सीएनजी क्षेत्रासाठी लागणाऱ्या नैसर्गिक वायूच्या इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्याने ही दरवाढ करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, मे महिन्यात सीएनजीच्या दरात ही दुसरी वाढ आहे. याआधी 9 मे रोजी प्रतिकिलो 1.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्येही सीएनजीचे दर वाढवण्यात आले होते. त्यानंतर महाराष्ट्रातही दरवाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती आणि अखेर ती खरी ठरली.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात वाढलेल्या तणावामुळे खनिज तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्याचा थेट परिणाम भारतातील इंधन दरांवर होताना दिसत आहे. गेल्या दहा दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चार वेळा वाढ करण्यात आली आहे. सोमवारी देशभरात चौथ्यांदा दरवाढ जाहीर करण्यात आली. त्यानुसार पेट्रोलच्या दरात 2.61 रुपये, तर डिझेलच्या दरात 2.17 रुपयांची वाढ झाली आहे.
इंधन टंचाईचा प्रश्न गंभीर
याआधी 15 मेपासून सुरू झालेल्या दरवाढीच्या मालिकेमुळे गेल्या दहा दिवसांत पेट्रोल तब्बल 7.38 रुपयांनी महागले आहे. तर डिझेलच्या दरात 7.09 रुपयांची वाढ झाली आहे. दरवाढीसोबतच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये इंधनटंचाईचाही प्रश्न गंभीर बनला आहे. बुलढाणा, वाशिम आणि परभणी जिल्ह्यांत डिझेलसाठी शेतकऱ्यांना रात्रभर पेट्रोल पंपांवर रांगा लावाव्या लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाढती महागाई आणि इंधनटंचाई यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी आणि वाहनचालकांचेही मोठे हाल होत आहेत.
हेही वाचा : Malaika Arora: मालदीवमध्ये मलायका अरोराचा बोल्ड अंदाज; ग्लॅमरस फोटो झाले व्हायरल






