बिहारमध्ये भाजपला सत्तेतून बेदखल केल्यानंतर आता सीबीआयच्या छाप्यांचा खेळ

पाटणा – बिहारमध्ये सत्तांतर होऊन नितीशकुमार यांनी भाजपला सत्तेतून बेदखल केल्यानंतर आता त्या राज्यात केंद्र सरकारी यंत्रणांकडून छापेमारी सुरू होईल अशी आशंका गेले काही दिवस व्यक्त होत होती, त्यानुसार आता तेथे प्रत्यक्षात छापे मारी सुरू झाली आहे.
आज येथील राष्ट्रीय जनता दलाचे आमदार सुनील सिंह यांच्या घरावर सीबीआय या केंद्रीय एजन्सीकडून छापे टाकण्यात आले आहेत. त्यांच्याप्रमाणेत राजदचे राज्यसभा सदस्य अशफाक करीम, फैयाज अहमद, माजी राजद आमदार सुबोध राय यांच्याही ठिकाणांवर सीबीआयने छापेमारी केल्याचे वृत्त आहे. रेल्वे नोकरीच्या बदल्यात जमिनी घेतल्याच्या प्रकरणात त्यांच्यावर हे छापे टाकले आहेत.
लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना त्यांनी अनेक उमेदवारांना मुंबई, कोलकाता, जबलपूर, जयपूर, हाजीपूर इत्यादी ठिकाणी नोकऱ्या लावून त्यांच्याकडून त्या बदल्यात जमिनी घेतल्याचा संशय आहे. या प्रकरणी 23 सप्टेंबर 2021 रोजी सीबीआयने 12 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यात लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबडीदेवी, त्यांच्या दोन मुली मिसा भारती, आणि हेमा यादव यांच्यावरही गुन्हे दाखल आहेत.
तथापि, हा राजकीयदृष्ट्या धमकावण्याचा प्रकार असून त्यातून आम्ही घाबरणार नाही आणि भाजपच्या दबावाला बळीही पडणार नाही, असे सुनील सिंह यांनी म्हटले आहे.
बेकायदेशीर खाणकाम आणि खंडणीच्या संदर्भात सुरू असलेल्या तपासातही केंद्रीय अन्वेषण विभागाकडून आज बिहार आणि झारखंडमधील रांची येथे अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे आमदार प्रतिनिधी पंकज मिश्रा यांच्या चौकशीनंतर हे छापे टाकण्यात येत आहेत. उपमुख्यमंत्री व राजदचे बिहारमधील नेते तेजस्वी यादव यांच्याशी संबंधित एका मॉलवरही छापे टाकले गेल्याचे वृत्त आहे.





