‘ऑपरेशन सिंदूर’ने बिथरलेला पाकिस्तान आक्रमक! नियंत्रण रेषेवर अंधाधुंद गोळीबार, 15 नागरिकांचा मृत्यू

Operation sindoor: भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ने पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत 90 दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानी लष्कराने नियंत्रण रेषेवर (एलओसी) अंधाधुंद गोळीबार सुरू केला आहे. जम्मू-कश्मीरमधील पुंछ आणि तंगधार परिसरात मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या या गोळीबारात 4 मुलांसह 15 नागरिकांचा मृत्यू झाला, तर 43 जण जखमी झाले आहेत. यामुळे सीमावर्ती गावांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.
पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर देत अनेक पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त केल्या आणि मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवलं. पुंछ जिल्ह्यातील बालाकोट, मेंढर, मनकोट, कृष्णा घाटी, गुलपुर, केरनी आणि पुंछ शहरात गोळीबाराचा सर्वाधिक फटका बसला. यामुळे डझनभर घरं आणि वाहनांचं नुकसान झालं. उरी सेक्टरमध्ये 5 मुलांसह 10 जण जखमी झाले, तर कुपवाड्यातील करनाह सेक्टरमध्ये अनेक घरांना आग लागली. पुंछ बस स्थानकही गोळीबाराच्या तडाख्यात सापडलं.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, पाकिस्तानच्या भारी तोफांनी केलेल्या गोळीबारामुळे नागरिकांना बंकरमध्ये आश्रय घ्यावा लागला किंवा सुरक्षित ठिकाणी पळ काढावा लागला. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी स्थानिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. मृतांमध्ये बलविंदर कौर (33), मोहम्मद झैन खान (10), जोया खान (12), मोहम्मद अकरम (40), अमरीक सिंह (55) यांच्यासह इतरांचा समावेश आहे.
जम्मू विभागीय आयुक्त रमेश कुमार यांनी जम्मू, सांबा, कठुआ, राजौरी आणि पुंछमधील सर्व शैक्षणिक संस्था बुधवारी बंद ठेवण्याचे आदेश दिले. भारतीय सैन्याच्या अतिरिक्त लोक सूचना महानिदेशालयाने (एडीजीपीआय) ‘एक्स’वर म्हटलं, “पाकिस्तानने पुंछ-राजौरीत गोळीबार करत युद्धबंदी कराराचा भंग केला आहे. भारतीय सैन्य योग्य प्रत्युत्तर देत आहे.” 2021 च्या युद्धबंदी करारानंतर अशा घटना कमी झाल्या होत्या, पण ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानच्या आक्रमकतेने तणाव पुन्हा वाढला आहे.





