Cyclone Biparjoy : गुजरातनंतर आता राजस्थानलाही ‘बिपरजॉय’चा तडाखा

बाडमेर :- गुजरातनंतर आता बिपरजॉय चक्रीवादळाचा तडाखा राजस्थान राज्याला बसला आहे. राजस्थानमधील बाडमेर आणि जालोर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर अनेक गावांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गेल्या 24 तासांपासून चक्रीवादळ सक्रीय झाल्याने या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. काल रात्रीपासून (ता. 17 जून) बिपरजॉय वादळामुळे ताशी 45 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहे. तर खबरदारी म्हणून बाडमेर आणि जालोरमधील पाच हजार नागरिकांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी हलवले आहे.
शनिवारी रात्रीपासून राजस्थानमध्ये बिपरजॉय चक्रीवादळाचा सर्वाधिक प्रभाव दिसून आला. यामुळे बखासर, शेवडा, धनाळ, धोरिमाण्णा आणि चौथण या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. हवामान खात्याकडून आधीच राज्यात रेड अलर्ट जारी करण्यात आलेला होता. राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले असून 100 हून अधिक गावांमध्ये वीजपुरवठा खंडीत झाला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, माउंट अबूमध्ये 210 मिमी, बाडमेरच्या सेवदामध्ये 136 मिमी, माउंट अबू तहसीलमध्ये 135 मिमी, जालोरच्या राणीवाडामध्ये 110 मिमी, चुरूच्या बिदासरामध्ये 76 मिमी, रेवदारमध्ये 68 मिमी, सांचोरेमध्ये 59 मिमी आणि पिनवर 5 मिमी पाऊस पडला आहे.
दरम्यान, राजस्थानच्या आधी बिपरजॉय चक्रीवादळ हे गुजरातच्या समुद्रकिनाऱ्याला धडकले होते. गुजरातमध्ये या वादळामुळे हाहाकार माजला होता.





