अमली पदार्थ जप्त केल्यानंतर विविध शंकांना बळ; उपचार सोडून ससूनमध्ये चालतेय भलतेच काही

संजय कडू
पुणे – ससून हॉस्पिटल परिसरातून मेफेड्रॉन अमली पदार्थ जप्त करण्यात आला. या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्यामुळे आरोपींना कोण मदत करत होते? यांसह अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ललित पाटील (वय 34) याला 2020 मध्ये चाकण पोलिसांनी अंमली पदार्थ प्रकरणात अटक केली.
टी.बी. आजाराचा त्रास वाढल्याने येरवडा कारागृहातील डॉक्टरांच्या शिफारशीनुसार त्याला ससूनमध्ये नेण्यात आले. पण, जून-2023 पासून तो तेथेच ठाण मांडून आहे. यानंतर त्याने हार्निया आणि नंतर पोटात सूज असल्याचे सांगितले. याप्रकारे आजारांची यादी वाढवत त्याने मुक्काम ठोकला आहे. ललित पाटील दाखल असलेल्या वॉर्ड क्रमांक 16 येथे कैद्यांना विविध उपचारांसाठी दाखल केले जाते.
तेथे पोलीस मुख्यालयाचे उपायुक्त आणि सहायक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त असतो. असे असूनही अनेक कुख्यात कैदी उपचाराच्या नावाखाली येथेच तळ ठोकतात आणि तेथूनच गुन्हेगारीची सूत्रे हलवत असतात. त्यांना तेथे “सर्व’ सुविधा कशा मिळतात? हे लक्षात घेता “वॉर्ड क्र. 16′ हाच संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हे सव्वादोन कोटी रुपयांचे अमली पदार्थ कोणी, कोठून आणले? आणि ते कोणाला पुरवले जाणार होते? याचा शोध आता पोलीस आता घेत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
सुभाष-ललित यांचे कारागृह “कनेक्शन’
यातील सुभाष मंडल हा राजगड पोलीस ठाण्यात दाखल दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. त्याच्यावर “मोक्का’अंतर्गत कारवाई झाली होती. त्या गुन्ह्यातून जानेवारीत सुटला होता. येरवडा कारागृहात शिक्षा भोगताना, त्याची ललित पाटीलसोबत ओळख झाली. यातूनच कारागृहाबाहेर पडल्यावर त्याने ललितसाठी काम करण्यास सुरुवात केली, असे पोलिसांनी सांगितले.
एकच वेटर पाच वर्षे कैद्यांना देतोय “सेवा’
या प्रकरणातील आरोपी रौफ शेख हा ससूनमधील कॅन्टीनचा कर्मचारी आहे. तो मागील पाच वर्षे वॉर्ड क्र. 16 मध्ये “सेवा’ पुरवत आहे. यामुळे त्याचे उपचारासाठी आलेले कैदी तसेच पोलिसांशी लागेबांधे निर्माण झाले. ललित पाटील याने मागवलेल्या अमली पदार्थाची डिलिव्हरी रौफने सुभाष मंडल याला केली. यामुळे कॅन्टीनचे कर्मचारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमार्फत आतमध्ये मोबाइल आणि इतर वस्तू पाठवत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
कारवाईनंतर निर्माण झालेले प्रश्न
- ललित पाटीलकडे सापडलेले दोन मोबाइल फोन आत कसे गेले?
- ललित हा फोनवरुन संवाद साधत असल्याचे बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांना कसे समजले नाही?
- वॉर्डमधील बंदोबस्त पाहणीची जबाबदारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची असते. त्यांनी तेथे वेळोवेळी भेट दिली आहे का?
- अधिकारी भेटीचे नोंद रजिस्टर पोलिसांनी तपासले आहे का?
- मागील तीन महिन्यांत येथे पोलिसांना ड्युटी कोणी लावली?





