चीननंतर भारत कॅनडासाठी धोकादायक; उच्चस्तरीय समितीने केला गंभीर आरोप

टोरांटो – गेल्या काही काळात भारत आणि कॅनडा संबंधांत काहीशी कटुता निर्माण झाली असताना त्या देशातील एका समितीने असा गंभीर आरोप केला आहे चीननंतर भारत हा देश कॅनडासाठी सगळ्यांत धोकादायक आहे. तर कॅनडाच्या पंतप्रधानांनीही त्यांच्या देशात इतर देशांच्या होत असलेल्या हस्तक्षेपाबाबत चिंता व्यक्त केली आहे.
कॅनडाच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि गुप्तचर विषयक संसदीय समितीने हा अहवाल जारी करत भारत आणि कॅनडातील कटुता वाढवण्याचेच काम केले आहे. खलिस्तानवादी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येच्या संदर्भात गंभीर आरोप करून भारताच्या विरोधात विष ओकण्याचे काम यापूर्वीही कॅनडाने केले आहे.
आता आलेल्या नव्या अहवालामुळे संबंध आणखीच खराब होण्याची शक्यता आहे. खलिस्तान समर्थकांच्या संदर्भात कॅनडात भारताचा वाढत चाललेला हस्तक्षेप कॅनडाच्या लोकशाही संस्थांसाठी आणि लोकशाही प्रक्रियांसाठी धोकादायक बनला आहे असे नमूद करत ८४ पानांच्या अहवालात भारतावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान, अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.





