बिहारनंतर आता ‘या’ राज्यात होणार जातनिहाय जनगणना; पुढच्या महिन्यात मुख्यमंत्री करणार अहवाल सादर

Caste Census Report : बिहारने मागच्या आठवड्यात जातीनिहाय जनगणना केल्यानंतर त्याची आकडेवारी सार्वजनिक केली. त्यामुळे देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, बिहारच्या या जातनिहाय जनगणने नंतर आता आणखी एक राज्य जातनिहाय जनगणना करणार असल्याची माहिती समोर येत आहे. कर्नाटकचे राज्य सरकार जातनिहाय जनगणना अहवाल (Caste Census Report) हा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष के. जयप्रकाश हेगडे हे नोव्हेंबरमध्ये सादर करणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी सादर केल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी म्हटले आहे.
म्हैसूरमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या बोलत होते. त्यावेळी त्यांनी ‘‘आमचा समाज जातिव्यवस्थेवर आधारित आहे. प्रत्येकाला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समानता दिली पाहिजे. त्यासाठी जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी हवी आहे. त्यासाठी आम्ही जातीनिहाय जनगणना केली होती.
जातनिहाय जनगणना झाली, तेव्हा कांतराजू हे मागासवर्गीय आयोगाचे (Backward Classes Commission) अध्यक्ष होते. कांतराजू अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी स्वीकारला नाही. विद्यमान अध्यक्षांशी चर्चा केली आहे. ते नोव्हेंबरमध्ये अहवाल देणार आहेत,” अशी माहिती सिद्धरामय्या यांनी दिली.
तसेच अहवाल सरकारच्या हाती आल्यानंतर निर्णय घेऊ. सरकारी योजना सर्वस्तरातील नागरिकांपर्यंत पोचवण्यासाठी जात आणि सामाजिक जनगणना आणि त्याची आकडेवारी आवश्यक आहे, असेही सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.




