आग्रा जलमय ! तब्बल 45 वर्षानंतर यमुनेचे पाणी पोहचले ताजमहालच्या भिंतींपर्यंत पहा Photo

नवी दिल्ली – आग्रा येथील यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. यमुनेचे पाणी ताजमहालाजवळील भिंतीपर्यंत पोहोचले आहे. येथे आता वाळूच्या पिशव्या लावून पाणी आत जाऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यमुनेचे पाणी सामान्य दिवसात खूपच कमी असल्याने यमुनेच्या काठावर पर्यटकांना बसण्यासाठी बाकही बसविण्यात आले आहेत. ताजमहाल पाहण्यासाठी येणारे पर्यटक यमुनेच्या काठावर बांधलेल्या बाकांवर बसून या नदीचे पाणी पाहत असत, मात्र सध्या यमुनेला पूर आल्याने सर्व काही बंद आहे. पूर मदत कार्यात गुंतलेल्या लोकांनाच येथे जाण्याची परवानगी आहे.

ताजमहाल जवळ बांधलेला दसरा घाटही पाण्यात बुडाला आहे. पोलिसांनी लोकांना घाटाच्या किनाऱ्यावर जाण्यापासून रोखले आहे. आग्रा येथील यमुनेच्या पाण्याची पातळी अशीच वाढत राहिल्यास ताजमहाल पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा त्रास वाढू शकतो. यमुनेच्या काठावरचा रस्ता पाण्याने तुडुंब भरला आहे. पुराच्या धोक्याची भीती असलेल्या लोकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.

1978 मध्ये ताजच्या भिंतीपर्यंत पाणी पोहोचले होते.
आग्रामध्ये 45 वर्षांनंतर यमुना नदीच्या पाण्याने ताजमहालच्या भिंतीला स्पर्श केला आहे. 1978 मध्ये येथे पूर आला होता, तेव्हा पुराची पातळी 508 होती. त्यावेळी ताजमहालच्या भिंतीपर्यंत पाणी पोहोचले होते. यमुनेच्या काठावर वसलेली अनेक गावे आणि वसाहती पाण्याखाली गेल्या होत्या. सोमवारी सकाळी पुन्हा ताजमहालच्या भिंतीपर्यंत पाणी पोहोचले. ताजमहालजवळील स्मशानभूमीही जलमय झाली आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारांवरही बंदी घालण्यात आली आहे.
यमुनेने धोक्याचा पातळी ओलांडली
यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. आज सकाळी यमुना नदीची पाणी पातळी ४९७.२० फुटांवर पोहोचली आहे. यमुना नदीचे पाणी ताजमहालच्या पाठीमागे असलेल्या ताजव्यू पॉईंटवरही पोहोचले असून, त्यानंतर ते सामान्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. यासोबतच ताजमहालच्या मागे मेहताब बागेजवळ असलेल्या ताज सुरक्षा पोलिस चौकीतही पाणी तुंबले आहे. यमुनेचे पाणी चौकीपर्यंत पोहोचल्यानंतर तेथे सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस आपले सामान घेऊन जवळच बांधलेल्या तात्पुरत्या चौकीत जात आहेत.





