दिल्लीत यमुनेने पुन्हा धोक्याची पातळी ओलांडली; पुन्हा पुराचे संकट

नवी दिल्ली – दिल्लीच्या परिसरात पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाल्याने यमुनेच्या पाण्याची पातळी बुधवारी सकाळी पुन्हा धोक्याच्या खुणेच्यावर गेली आहे. कालपरवाच ही पातळी ओसरण्यास सुरुवात झाली होती पण पुन्हा बारा तासांनंतर यमुनेच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
केंद्रीय जल आयोगाच्या आकडेवारीनुसार सकाळी 8 वाजता पाण्याची पातळी 205.48 मीटर इतकी होती आणि एका तासानंतर ती 205.60 मीटरवर पोहोचली. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तो 205.72 मीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने 22 जुलैपर्यंत उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमधील एकाकी ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि बुधवारी दिल्लीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे.
आठ दिवसांपासून यमुनेचे पाणी धोक्याच्या खुणेवर वाहत होते. पण मंगळवारी रात्री 8 वाजेपर्यंत नदीतील पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हाच्या खाली ओसरली. बुधवारी सकाळी 5 वाजता ती पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे राजधानीच्या सखल भागात बाधित कुटुंबांच्या पुनर्वसन कामात अडथळे निर्माण होऊ शकतात. आणि तेथील लोकांना मदत छावण्यांमध्ये जास्त काळ राहावे लागू शकते.
वजिराबाद येथील पंप हाऊस पाण्याखाली गेल्याने पुन्हा पाणीपुरवठ्यावरही याचा परिणाम होऊ शकतो. वाढत्या पाण्यामुळे दिल्लीला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकेंद्रांच्या कार्यात अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे दिल्लीच्या पाणी पुरवठ्यावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे.





