Agra News : रील बनवणं बेतलं जीवावर ! यमुना नदीत बुडून 6 तरुणींचा दुर्दैवी मृत्यू

आग्रा : आग्रा येथील सिकंदरा भागातील नागला नाथू गावात यमुना नदीत रील बनवताना पाण्यात बुडून 6 मुलींचा मृत्यू झाला. त्यापैकी तीन मुली एकाच कुटुंबातील होत्या तर इतर तीन त्यांच्या नातेवाईक होत्या. 6 बहिणींच्या मृत्यूच्या या दुःखद घटनेने संपूर्ण गाव हादरून गेले. यमुनेमध्ये आंघोळ करण्यापूर्वी या मुलींनी त्यांच्या मोबाइलवर एक व्हिडिओ बनवला आणि हा व्हिडिओ त्यांच्या आयुष्यातील शेवटचा व्हिडिओ ठरला.
या किशोरवयीन मुलींचे वय 12 ते 15 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जाते. उन्हाळी सुट्टीत या सर्व मुली गावाला भेट देण्यासाठी आल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी या मुली यमुना नदीच्या घाटावर आंघोळीसाठी गेल्या होत्या. आंघोळ करत असताना त्या नदीच्या मध्यभागी गेल्या आणि भोवऱ्यात अडकल्या. काठावर उपस्थित असलेल्या इतर मुलांनी तातडीने गावाला मुली नदीत बुडत असल्याची माहिती दिली. गावकऱ्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली.
स्थानिक गोताखोरांनी शोध सुरू केला, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर सर्व मुलींना नदीतून बाहेर काढण्यात आले, परंतु तोपर्यंत चार मुलींचा मृत्यू झाला होता. तर दोन मुलींचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.या अपघातानंतर, नागला नाथू आणि आसपासच्या गावांमध्ये शोककळा पसरली. यमुना घाटावर लोकांची गर्दी जमली होती.





