IND vs PAK : …तर भारताचा विराट कोहली अन् पाकचा बाबर एकाच टीमकडून खेळताना दिसतील

Afro Asia Cup : क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की आफ्रो-आशिया कप पुन्हा सुरू होणार आहे. आफ्रिकन क्रिकेट असोसिएशन (एसीए) ने गेल्या शनिवारी आपली वार्षिक बैठक घेतली, ज्यामध्ये सहा लोकांची अंतरिम समिती स्थापन करण्यात आली, जी आशियाई आणि आफ्रिकन क्रिकेटपटूंना अधिक संधी देण्याच्या दिशेने पावले उचलेल. ही समिती इतर देशांच्या क्रिकेट संघटनांशी संपर्क साधून विविध खंडांमध्ये क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यासाठी आग्रही राहणार आहे. आफ्रो-आशिया चषक देखील त्यापैकी एक असू शकतो.
आफ्रो-आशिया कपमध्ये आशिया इलेव्हन आणि आफ्रिका इलेव्हन संघ आमनेसामने येतात. ही स्पर्धा पहिल्यांदा 2005 मध्ये खेळली गेली, ज्याचे आयोजन दक्षिण आफ्रिकेने केले होते, तर 2007 मध्ये भारताने यजमानपद भूषवले होते. त्याची तिसरी आवृत्ती 2009 मध्ये केनियामध्ये होणार होती, परंतु त्या वर्षी आफ्रो-आशिया कप खेळला जाऊ शकला नाही. ही स्पर्धा यासाठी विशेष असणार आहे की, यामध्ये भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडू एकत्र खेळताना दिसू शकतात, ज्यांच्यामध्ये गेल्या दीड दशकात एकही द्विपक्षीय मालिका खेळली गेली नाही. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आफ्रो आशिया चषक स्पर्धेचे पुनरागमन झाले तर अनोख्या स्पर्धेत विराट कोहली (Virat Kohli) आणि बाबर आझम (Babar Azam) एकाच संघात खेळताना दिसतील.
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या मते, एसीएचे अंतरिम अध्यक्ष तवेंगा मुकुलानी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “क्रिकेटमध्ये अधिक संधी उपलब्ध करून देण्याव्यतिरिक्त, आफ्रो-आशिया कप दोन्ही बाजूंसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल.” मुकुलानी म्हणाले, “आम्ही आशिया क्रिकेट परिषदेच्या अधिकाऱ्यांशी बोललो आहोत आणि आफ्रिकन क्रिकेट संघटनांशीही संपर्क साधला आहे. ते सर्व आफ्रो-आशिया कप पुन्हा सुरू करण्याच्या बाजूने आहेत.”
साल 2005 मध्ये झालेली तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली होती. त्यावेळी वीरेंद्र सेहवाग, शाहिद आफ्रिदी आणि सनथ जयसूर्या एकत्र खेळताना दिसले होते. तर 2007 मध्ये आशिया इलेव्हनने आफ्रिका इलेव्हनचा 3-0 असा पराभव केला होता. त्यावेळी शोएब अख्तर, एमएस धोनी, झहीर खान आणि मोहम्मद आसिफ सारख्या दिग्गजांचा समावेश होता.





