Pune Rural News : अॅड. उदय सरोदे यांना ‘भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदुरत्न पुरस्कार’ जाहीर

शिरूर : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील डॉ. मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट व डॉ. रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दिला जाणारा “भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदुरत्न पुरस्कार – २०२५” यंदा घोडनदी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. उदय सरोदे यांना जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार राष्ट्रपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त समाजसेवा, राष्ट्रीय एकता व मानवकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. पुरस्कार प्रदान समारंभ ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी पुणे येथे पार पडणार असून विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अॅड. सरोदे यांचा गौरव करण्यात येणार आहे.
अॅड. उदय सरोदे हे न्हावरे फाटा (ता. शिरूर) येथे मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी निवासी विद्यालय चालवतात. शिक्षण, संस्कार आणि समाजाभिमुख मूल्ये जोपासणाऱ्या या संस्थेमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडले आहे. सामाजिक जाण, मानवतेची भावना आणि दुर्बल घटकांसाठी सातत्याने कार्य करण्याची त्यांची वृत्ती या सर्व कारणांमुळेच या प्रतिष्ठित सन्मानासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
या पुरस्कारामुळे केवळ अॅड. सरोदे यांचा नव्हे, तर घोडनदी बार असोसिएशन व शिरूर तालुक्याचा मान अधिक उंचावला आहे. स्थानिक नागरिक, सहकारी व सामाजिक संस्थांकडून अॅड. सरोदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. समाजातील उपेक्षित घटकांसाठी कार्य करणे हीच खरी देशसेवा आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायी ठरेल,” असे अॅड. सरोदे यांनी या प्रसंगी सांगितले.





