‘ऍडमिशन’ रॅकेट? नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नावाखाली २१ लाखांचा गंडा

प्रभात वृत्तसेवा
पुणे – नामंवत अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश देण्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक केल्याचा बंडगार्डन पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी वासिर खानने (रा.वाराणसी) सात- आठजणांची फसवणूक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.वासिर पुणे स्टेशन परिसरातील सोसायटीत रहायला असून त्याने महाविद्यालय प्रवेशासाठी सल्ला देण्याचे कार्यालय उभारले होते. एका महिलेने बंडगार्डन ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार, त्या चिंचवडमधील केशवनगरमध्ये राहतात.
आरोपीने मे महिन्यात त्यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधून मुलाला नामवंत महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो, असे आमिष दाखविले. त्यानंतर त्यांना स्टेशन परिसरातील परमार बिल्डींगजवळ भेटायला बोलाविले. प्रवेशासाठी त्याने पैसे घेतले. हव्या त्या कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्याने विचारणा केली असता आरोपीने टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर महिलेने तक्रार दिली. आरोपीने अशा पद्धतीने सात ते आठ पालकांची फसवणूक केली आहे.
याबाबत त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहेत. आरोपीने प्रवेशाच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक केली आहे. सध्या वासिर खान कार्यालय बंद करुन पळून गेला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता तपास करत आहेत.चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश देण्याच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांचा निकाल, त्यांची माहिती मिळवून आरोपी पालकांशी संपर्क साधतात. कमी गुण मिळवणाऱ्यांच्या संपर्कात राहून फसवणूक करतात. परराज्यातील विद्यार्थ्यांची फसवणूक जास्त प्रमाणात केली जाते. प्रवेश देण्याचे आमिष दाखविणाऱ्या गुन्हेगारांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.





