Pune : अकरावीसाठी राज्यातील ४ लाख ५७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

पुणे – राज्यात केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत इयत्ता अकरावीसाठीच्या पहिल्या नियमित प्रवेश फेरीअंतर्गत एकुण ४ लाख ५७ हजार २६१ विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित झाले आहेत. या प्रवेश फेरीची मुदत सोमवारी (दि.७) संपणार आहे.
इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यातील ९ हजार ४३५ कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली. प्रवेशासाठी एकुण १३ लाख ६६ हजार ६३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. विद्यार्थी एकूण प्रवेश क्षमता २१ लाख २३ हजार ७२० असून त्यापैकी कॅप फेरीसाठी प्रवेश क्षमता १६ लाख ७० हजार ५९८ तसेच कोटा प्रवेश क्षमता ४ लाख ५३ हजार १२२ इतकी आहे.
कॅपअंतर्गत 3 लाख ८२ हजार ३७५ तर अल्पसंख्यांक, इन-हाऊस, व्यवस्थापन या कोटातंर्गत ७४ हजार ८८६ विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयात आपला प्रवेश निश्चित केला आहे. कॅपअंतर्गतच्या १२ लाख ८८ हजार २२३ व कोट्याअंतर्गतच्या ३ लाख ७८ हजार २३६ याप्रमाणे १६ लाख ६६ हजार ४५९ प्रवेशाच्या जागा अद्यापही रिक्त पडल्या आहेत.
पहिल्या नियमित प्रवेश फेरीत प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांना २ ते ७ जुलै अशी मुदत देण्यात आलेली आहे. नवीन विद्यार्थी नोंदणीही सुरु ठेवण्यात आलेली आहे. पहिल्या फेरीत अर्जाचा भाग-१ अपुर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज पुर्ण करण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. दुसरी नियमित प्रवेश फेरीमध्ये कनिष्ठ महाविद्यालयाचे पसंतीक्रम नोंदविण्यासाठी अर्जाचा भाग -२ भरण्यासाठी १० ते १३ जुलै अशी मुदत देण्यात आलेली आहे.





