सिद्धार्थ चांदेकरचा कौतुकास्पद निर्णय; आईचे लावून दिले दुसरं लग्न

मुंबई – मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सोशल मीडियावर सक्रिय असतो. पत्नी अभिनेत्री मिताली मयेकरसोबतचे त्याचे रोमॅंटिक अंदाजातील फोटो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. नुकतेच त्याने त्याच्या आईचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे सिद्धार्थ चांदेकरची आई सीमा चांदेकर या पुन्हा विवाहबंधनात अडकल्या आहेत. ही बातमी त्याने सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांना दिली आहे.
सिद्धार्थने त्याच्या आईचे पुन्हा लग्न लावून दिले आहे. याबाबत इनस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत त्याने लिहिले की, “तू आत्तापर्यंत सगळ्यांचा विचार केलास, सगळ्यांसाठी पाय झिजवलेस. आता फक्त तुझा आणि तुझ्या नव्या जोडीदाराचा विचार कर. तुझी पोरं कायम तुझ्या पाठीशी आहेत. तू माझं लग्न थाटात लावलंस, आता मी तुझं लग्न लावून देत आहे. माझ्या आयुष्यातलं अजून एक सुंदर लग्न. माझ्या आईचं! I love you आई! Happy Married Life”, असे सिद्धार्थ चांदेकरने म्हटले आहे.
View this post on Instagram
सिद्धार्थने हा फोटो शेअर करताच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच सिद्धार्थच्या निर्णयाचं कौतुकही होत आहे. याशिवाय सई ताम्हणकर, प्रिया बापट, प्रसाद ओक, स्पृहा जोशी, मृण्मयी गोडबोले, गौतमी देशपांडे, निवेदिता सराफ, आदिनाथ कोठारे, मधुराणी गोखले प्रभुलकर या कलाकारांनी देखील कमेंट करुन सिद्धार्थच्या आईला शुभेच्छा दिल्या आहेत.
तर मितालीने देखील सासूसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. ‘सासूबाई! माझ्या सासूचं लग्न! किती सूना हे म्हणू शकतात की मी माझ्या सासूच्या लग्नात हजर होते? खरंच मला अभिमान वाटते तुझा की हा एव्हढा मोठ्ठा निर्णय तू अगदी न डगमगता घेतलास. मला अभिमान वाटतो तुझ्या मुलाचा की तो सुद्धा खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा राहिला. आणि मला अभिमान वाटतो या एका अतिशय कमाल कुटुंबाचा एक भाग असण्याचा.आजवर तू आमच्या सगळ्यांसाठी सगळं अगदी मनापासून केलंस. पण आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आलीये. अशीच कायम आनंदात राहा, हसत राहा. बाकी आम्ही मुलं तुझ्यासोबत आहोतच. तुला आणि नितिन काकांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम.’ असे मितालीने पोस्टमध्ये लिहिले आहे.





