प्रशासनाचा हलगर्जीपणा! ऐन दिवाळीत सफाई कर्मचारी पगाराविना,नगरपरिषदेची जबाबदारी झटकण्याची खेळी

प्रभात वृत्तसेवा
राजगुरुनगर – दिवाळीचा सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, प्रकाश आणि उत्साह घेऊन येतो. मात्र राजगुरुनगर नगरपरिषदेतील हंगामी सफाई कामगारांसाठी यंदाची दिवाळी अंधारात जात आहे. सप्टेंबर महिन्याचा पगार अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे रोज शहराची साफसफाई करून, कचरा गोळा करून शहर स्वच्छ ठेवणार्या या कर्मचार्यांना आपल्या कुटुंबाचा दिवाळीचा आनंद मात्र गाठता येणार नाही.राजगुरुनगर नगरपरिषदेत सध्या 38 हंगामी सफाई कामगार कार्यरत आहेत. गेल्या नऊ महिन्यांपासून हे कर्मचारी ठेकेदाराच्या माध्यमातून काम करत आहेत, त्यांचे व्यवस्थापन नगरपरिषद करते.
या कर्मचार्यांचा पगार ठेकेदार विक्रम मोहिते यांच्या मार्फत केला जातो. आतापर्यंत प्रत्येक महिन्याचा पगार आठ ते दहा तारखेपर्यंत मिळत होता. मात्र सप्टेंबर महिन्याचा पगार ऑक्टोबरच्या अखेरीसही न मिळाल्याने कर्मचार्यांच्या नाराजीचा सूर चढला आहे.दिवाळीचा सण आहे. कामगारांच्या कुटुंबातील सदस्य पगारावर अवलंबून आहे फटाके, कपडे मिळतील त्या आशेवर आहेत.शेजारी पाजारी दिवाळी साजरी करत आहेत मात्र या कामगारांची दिवाळी अजून गोड होत नाही.
आज सोमवारी (दि. 20 ऑक्टोबर) या हंगामी कर्मचार्यांनी राजगुरुनगर नगरपरिषदेच्या दारातच दिवसभर बसून पगार न मिळाल्याचा निषेध नोंदवला. संध्याकाळपर्यंत कुणीतरी येईल आणि पगार मिळेल या आशेवर त्यांनी दिवस घालवला आहे.कर्मचार्यांच्या म्हणण्यानुसार, घरात किराणा संपला आहे. मुला-बाळांची दिवाळीची खरेदी झाली नाही. बोनस तर दूरच, पगारही मिळालेला नाही. घर चालवणे कठीण झाले आहे. दरम्यान, नागरिकांनी या प्रकरणाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन सफाई कर्मचार्यांना तातडीने पगार देण्याची मागणी केली आहे. कारण शहर स्वच्छ ठेवणार्या हातांची दिवाळी अंधारात जाऊ नये, हीच लोकांची अपेक्षा आहे.
जबाबदारीची चूक कोणाची?
या संपूर्ण प्रकरणात नगरपरिषद आणि ठेकेदार दोघांकडून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न दिसत आहे. नगरपरिषदेकडून सांगण्यात येते की ठेकेदाराला ठरलेले पैसे देण्यात आले आहेत, त्यामुळे कर्मचार्यांच्या पगाराची जबाबदारी ठेकेदाराची आहे. दुसरीकडे ठेकेदारांकडून मात्र थोडा विलंब झाला असला तरी पगारात तडजोड होणार नाही अशी माहिती कर्मचार्यांना देण्यात आली आहे.
पगार लवकर मिळेल
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांनी सांगितले की, ठेकेदाराशी संपर्क साधला असून त्यांनी पगाराबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. थोडा विलंब झाला असला तरी कामगारांना लवकरच पगार मिळेल. त्यांच्या मेहनतीत कुठलीही तडजोड होणार नाही.
शहर स्वच्छ, पण आमचं घर काळोखात
हंगामी कामगार म्हणतात, दररोज सकाळपासून शहराची स्वच्छता करतो, कचरा गोळा करतो, लोकांच्या घरात दिवाळीचा प्रकाश पोहोचवतो. पण आमच्या स्वतःच्या घरात मात्र अंधार आहे.





