शैक्षणिक : शिक्षकांच्या सुट्ट्या?
शिक्षकांच्या सुट्ट्यांकडे (Teachers' Holidays) केवळ मोकळ्या वेळाच्या चष्म्यातून पाहणे चुकीचे ठरेल. त्या सुट्ट्या म्हणजे शिक्षणाच्या गुणवत्तेमध्ये केलेली गुंतवणूक आहे.

– दिपाली कांबळे
Teachers’ Holidays : शिक्षकांच्या सुट्ट्यांकडे (Teachers’ Holidays) केवळ मोकळ्या वेळाच्या चष्म्यातून पाहणे चुकीचे ठरेल. त्या सुट्ट्या म्हणजे शिक्षणाच्या गुणवत्तेमध्ये केलेली गुंतवणूक आहे.
अलीकडच्या काळात शिक्षकांच्या सुट्ट्यांबाबत (Teachers’ Holidays) सार्वजनिक चर्चांमध्ये अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. शाळा आणि महाविद्यालयांना मिळणार्या उन्हाळी, दिवाळी किंवा इतर सुट्ट्यांकडे पाहून काहीजण असा युक्तिवाद करतात की शिक्षकांना इतर व्यावसायिकांच्या तुलनेत जास्त सुट्ट्या मिळतात.
सामाजिक माध्यमांवरही शिक्षकांच्या सुट्ट्यांवर विनोद किंवा टीका केली जाते. परंतु या चर्चांमध्ये शिक्षकांच्या कामाचे वास्तव, त्यांची जबाबदारी आणि शिक्षण व्यवस्थेतील त्यांची भूमिका यांचा सखोल विचार अनेकदा दिसून येत नाही. वस्तुतः शिक्षकांच्या सुट्ट्या हा केवळ विश्रांतीचा प्रश्न नसून शिक्षणाच्या गुणवत्तेशी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाशी आणि समाजाच्या भवितव्याशी संबंधित विषय आहे.
समाजात शिक्षकांच्या (Teachers’ Holidays) कामाचे जे दृश्य स्वरूप दिसते ते मुख्यतः वर्गातील अध्यापन असते. शिक्षक वर्गात येतात, विद्यार्थ्यांना शिकवतात आणि दिवस संपल्यानंतर घरी जातात, अशी एक साधी प्रतिमा अनेकांच्या मनात असते. मात्र शिक्षकांचे काम यापेक्षा खूप व्यापक आणि गुंतागुंतीचे असते. एका तासाच्या प्रभावी अध्यापनामागे अनेक तासांची तयारी असते.
धड्याचे नियोजन करणे, संदर्भ साहित्याचा अभ्यास करणे, विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार उदाहरणे निवडणे, अध्यापनासाठी सादरीकरणे तयार करणे आणि विद्यार्थ्यांच्या समजुतीनुसार शिकवण्याच्या पद्धती विकसित करणे या सर्व गोष्टी वर्गाच्या बाहेर घडत असतात. त्यामुळे शिक्षकांच्या कामाचे मूल्यांकन केवळ वर्गात घालवलेल्या वेळेवर करणे योग्य नाही.
आजचा शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा राहिलेला नाही. तो विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक, समुपदेशक, प्रेरणादाता आणि अनेकदा त्यांच्या भावनिक आधाराचा स्तंभ असतो. समाजातील बदलत्या परिस्थितीत विद्यार्थी विविध मानसिक, सामाजिक आणि आर्थिक आव्हानांचा सामना करत असतात. काही विद्यार्थी नैराश्य, आत्मविश्वासाचा अभाव, कौटुंबिक तणाव किंवा स्पर्धेच्या दबावातून जात असतात.
अशा वेळी शिक्षक त्यांच्यासाठी आधारवडाची भूमिका बजावतात. विद्यार्थ्यांच्या भावनिक आणि मानसिक गरजा समजून घेण्यासाठी शिक्षकांना सातत्याने सजग राहावे लागते. या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात मानसिक आणि भावनिक ऊर्जा खर्च होते. त्यामुळे शिक्षकांना मानसिक पुनर्बांधणीसाठी आणि तणावमुक्तीसाठी सुट्ट्या आवश्यक असतात.
परीक्षा आणि मूल्यमापन हा शिक्षकांच्या कामाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा दिल्यानंतर त्यांचे काम संपल्यासारखे वाटते, परंतु शिक्षकांचे खरे काम तेव्हाच सुरू होते. उत्तरपत्रिका तपासणे ही केवळ गुण देण्याची प्रक्रिया नसून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे आणि आकलनाचे अचूक मूल्यमापन करण्याची जबाबदारी असते.
एका गुणाचा परिणाम विद्यार्थ्याच्या करिअरवर, प्रवेश प्रक्रियेवर किंवा शिष्यवृत्तीवर होऊ शकतो. त्यामुळे शिक्षकांना प्रत्येक उत्तरपत्रिका काळजीपूर्वक तपासावी लागते. महाविद्यालयीन स्तरावर अनेक शिक्षकांना शेकडो उत्तरपत्रिका तपासाव्या लागतात. ही प्रक्रिया वेळखाऊ आणि मानसिकदृष्ट्या थकवणारी असते. सुट्ट्यांच्या काळातही अनेक शिक्षक हे काम करत असतात. सुट्ट्या शिक्षकांसाठी अभ्यास आणि आत्मविकासाची संधी देखील असतात.
बदलत्या जगात शिक्षणाच्या संकल्पना, तंत्रज्ञान आणि अध्यापनाच्या पद्धती झपाट्याने बदलत आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, डिजिटल शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, अनुभवाधारित शिक्षण, कौशल्याधारित शिक्षण आणि संशोधनाधारित अध्यापन यांसारख्या नवीन संकल्पना शिक्षकांनी आत्मसात करणे आवश्यक आहे. एक चांगला शिक्षक हा आयुष्यभर विद्यार्थीच राहतो. सुट्ट्यांच्या काळात अनेक शिक्षक कार्यशाळांमध्ये सहभागी होतात, नवीन पुस्तके वाचतात, संशोधन करतात, लेखन करतात आणि स्वतःची शैक्षणिक क्षमता वाढवतात. या आत्मविकासाचा थेट लाभ विद्यार्थ्यांना मिळतो.
शिक्षकांवर वाढत चाललेला प्रशासकीय भार हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आज शिक्षकांना केवळ अध्यापनापुरते मर्यादित राहता येत नाही. विविध शासकीय योजना, ऑनलाइन माहिती प्रणाली, संस्थात्मक अहवाल, सर्वेक्षणे, विद्यार्थी नोंदी, गुणवत्ता मूल्यांकन प्रक्रिया, निवडणूक कामे, जनगणना आणि इतर प्रशासकीय जबाबदार्या शिक्षकांवर सोपवल्या जातात.
अनेक शिक्षकांना अध्यापनापेक्षा अधिक वेळ कागदपत्रे आणि ऑनलाइन डेटा व्यवस्थापनासाठी खर्च करावा लागतो. या अतिरिक्त जबाबदार्यांमुळे त्यांच्या कामाचा ताण वाढतो. त्यामुळे सुट्ट्या हा काळ त्यांच्यासाठी प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा आणि पुढील शैक्षणिक वर्षाची तयारी करण्याचा महत्त्वाचा काळ ठरतो.
शिक्षकांच्या सुट्ट्यांबाबत चर्चा करताना त्यांच्या कौटुंबिक आयुष्याचाही विचार करणे आवश्यक आहे. शिक्षक हे देखील समाजातील इतर व्यक्तींप्रमाणेच पालक, मुलगा, मुलगी, पती किंवा पत्नी असतात. वर्षभराच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांना अनेकदा आपल्या कुटुंबासोबत पुरेसा वेळ घालवता येत नाही. विशेषतः परीक्षा, प्रवेश प्रक्रिया, निकाल आणि विविध शैक्षणिक उपक्रमांच्या काळात त्यांच्यावर कामाचा ताण अधिक असतो. सुट्ट्या त्यांना कुटुंबासोबत वेळ घालवण्याची आणि मानसिक संतुलन पुनर्स्थापित करण्याची संधी देतात.
जागतिक स्तरावरील अनेक संशोधनांनी शिक्षक हा सर्वाधिक तणावग्रस्त व्यावसायिक गटांपैकी एक असल्याचे दाखवून दिले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाची अपेक्षा, पालकांचा दबाव, संस्थात्मक उद्दिष्टे, बदलणारे अभ्यासक्रम आणि वाढत्या जबाबदार्या यामुळे शिक्षकांमध्ये मानसिक थकवा आणि ‘बर्नआउट’ची समस्या वाढत आहे.
काही लोक असा युक्तिवाद करतात की शिक्षकांच्या सुट्ट्या (Teachers’ Holidays) कमी केल्यास विद्यार्थ्यांना अधिक शिक्षण मिळेल. परंतु शिक्षणाची गुणवत्ता केवळ अध्यापनाच्या दिवसांवर किंवा तासांवर अवलंबून नसते. शिक्षण हा एक मानवी संवादाचा आणि प्रेरणेचा विषय आहे. प्रेरित, अभ्यासू आणि मानसिकदृष्ट्या सक्षम शिक्षक विद्यार्थ्यांवर अधिक प्रभाव टाकू शकतो.






