Satara: ध्वनीवर्धकाच्या दणदणाटाला प्रशासनाचा लगाम
Satara गणेश मंडळांच्या परवानग्यांसाठी एक खिडकी योजना केवळ कागदावर न ठेवता प्रत्यक्ष प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. मंडळांनी अर्ज केल्यानंतर संबंधित विभागांना आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ द्यावा, असे जिल्हाधिकारी पाटील यांनी स्पष्ट केले.

Satara: गणेश मंडळांच्या परवानग्यांसाठी उद्यापासून एक खिडकी योजना सुरू करणे, विसर्जन मार्गावरील खड्डे आठवडाभरात बुजवणे, लोंबकळणाऱ्या वीज वाहिन्या हटवणे, झाडांच्या फांद्या छाटणे, धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण आणि कृत्रिम विसर्जन तलावाची व्यवस्था करण्याचा निर्णय शांतता कमिटीच्या बैठकीत काल घेण्यात आला. मात्र, ध्वनीवर्धकाच्या दणदणाटावर प्रशासनाने संयमाची भूमिका घेत मंडळांनी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे, असा स्पष्ट संदेश दिला.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस नगराध्यक्ष अमोल मोहिते, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर, उपअधीक्षक विपुल पाटील, मुख्याधिकारी विनोद जळक, प्रांताधिकारी आशिष बारकुल, पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे, नीलेश तांबे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि गणेश मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
गणेश मंडळांच्या परवानग्यांसाठी एक खिडकी योजना केवळ कागदावर न ठेवता प्रत्यक्ष प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. मंडळांनी अर्ज केल्यानंतर संबंधित विभागांना आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ द्यावा, असे जिल्हाधिकारी पाटील यांनी स्पष्ट केले. नगरपालिकेच्या माध्यमातून परवानगी प्रक्रिया सुलभ करण्यावर भर देण्यात येणार आहे. गणेश विसर्जन आणि मिरवणूक मार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येणार असल्याचे सांगितले. मुख्याधिकारी विनोद जळक यांनी येत्या आठवड्यापर्यंत खड्डे भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिलासा मंडळांना दिला.
मिरवणूक मार्गावरील लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या उंच करणे, धोकादायक ठिकाणे तपासणे आणि मार्गावरील झाडांच्या फांद्या छाटण्याचे निर्देश देण्यात आले. केलेल्या कामाचे छायाचित्रण करून प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. वीज विभागाने बैठकीला येताना संबंधित प्रश्नांची माहिती घेऊन यावे, अन्यथा वरिष्ठांशी चर्चा करून प्रश्न सोडवावेत, असे सुनावत जिल्हाधिकाऱ्यांनी ‘नुसती चर्चा ऐकण्यासाठी बैठकीला येऊ नका,’ अशा शब्दांत वीज विभागाला सुनावले. मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उभारण्यात येणार असून मंडळांनी त्याचा वापर करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले. संगम माहुली येथे विसर्जनाच्या दिवशी पाण्याची पातळी योग्य राहण्यासाठी धरणातील पाणीपातळी नियंत्रणाबाबत पाटबंधारे विभागाला सूचना देण्यात येणार आहेत.
आवाजाच्या भिंतींवर प्रशासनाची स्पष्ट भूमिका
बैठकीतील सर्वाधिक चर्चेचा विषय ध्वनीवर्धक (आवजाची भिंत) ठरला. अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी ध्वनीवर्धकाच्या वाढत्या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना होणाऱ्या त्रासाकडे मंडळांचे लक्ष वेधले. “आपली स्पर्धा ध्वनीवर्धक वाजवण्याची नसावी. आपल्या आनंदामुळे इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्या,” असे त्यांनी स्पष्ट केले. सोलापूर ध्वनीवर्धकमुक्त होऊ शकते, तर सातारा का होऊ शकत नाही, याचा गणेश मंडळांनी विचार करावा, असेही त्यांनी सुनावले. पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन दिल्यास महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपण्याबरोबरच कलाकारांना रोजगार मिळेल, अशी भूमिका प्रशासनाने मांडली.
चांगल्या मंडळांना पालिकेची बक्षिसे
व्यसनमुक्त आणि सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेच्या वतीने बक्षीसे देण्याचा निर्णय घेण्यात आला. फिरती शौचालये, व्हिडिओ चित्रीकरण, पार्किंग व्यवस्था, स्वागत कमानी आणि मिरवणूक मार्गातील अडथळे दूर करण्याचे नियोजनही पालिकेने हाती घेतले आहे. गणेशोत्सव आणि ईद- ए- मिलाद हे दोन्ही सण सामाजिक सलोखा कायम ठेवून शांततेत आणि उत्साहात साजरे करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी स्पष्ट केले.





