Satara | प्रशासन आणि शिक्षक संघटनांनी समन्वयाने काम करावे

महाबळेश्वर, (प्रतिनिधी) – गुणवत्ता टिकवण्यासाठी अधिकारी, शिक्षक यांनी प्रामाणिक प्रयत्न केला तर निश्चित ध्येय गाठता येईल. यासाठी प्रशासन आणि शिक्षक संघटना यांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे यांनी केले.
महाबळेश्वर तालुका प्राथमिक शिक्षक संघातर्फे महाबळेश्वर तालुक्यात नव्याने रुजू झालेले शिक्षण विस्तार अधिकारी अभिजित भालेराव व नामदेव धनावडे यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी श्री. पळसे बोलत होते.
शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष सुरेंद्र भिलारे यांनी नवीन अधिकार्यांचे स्वागत करुन महाबळेश्वर तालुका शैक्षणिक उपक्रम व गुणवत्ता वाढीसाठी गटशिक्षणाधिकारी पळसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेले काम चांगल्या पध्दतीने सुरु असल्याचे सांगितले. यावेळी महाबळेश्वर तालुका जिल्हा व राज्याला देत असलेल्या शिक्षण महोत्सव, प्रज्ञा शोध परीक्षा, आणि वाचन कट्टा अशा उपक्रमाची माहिती प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक संजय संकपाळ यांनी दिली.
अभिजित भालेराव म्हणाले, 10 वर्ष आपल्या तालुक्यात बाहेर काम करताना आपल्या तालुक्यात परत येण्याची ओढ कायम होती पण अधिकारी म्हणून येणे हे माझ्यासाठी पुण्याचे काम असून शिक्षकांना दोष देण्यापेक्षा दोष दूर करून शिक्षण प्रवाह अधिक प्रवाही करेन. नामदेव धनावडे म्हणाले, महाबळेश्वर या दुर्गम तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी पळसे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोतोपरी प्रयत्न करू.
या कार्यक्रमासाठी नगरपालिका शिक्षक संघाचे अध्यक्ष संतोष शिंदे, सरचिटणीस अंकुश केळघणे, फलटणचे विस्तार अधिकारी धारासिंग निकाळजे व रवींद्र भरते, अरुण कदम, संजय पार्टे, अमित कारंडे, संतोष ढेबे, संजय सोंडकर,संतोष चोरगे, लक्ष्मण जाधव, रवी भिलारे, अनंत जाधव, संभाजी जाधव, दानवले गुरुजी, नारायण कासुर्डे, सुहास कुलकर्णी,तसेच संघप्रेमी शिक्षक उपस्थित होते. संतोष शिंदे यांनी आभार मानेल.





