Hockey Asia Cup 2025 : पाक खेळाडूंना भारतात हॉकी खेळण्याची परवानगी का? आदित्य ठाकरेंचा केंद्रावर हल्लाबोल

Aditya Thackeray on Hockey Asia Cup 2025 : यंदा २७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२५ या कालावधीत भारतात होणाऱ्या पुरुष हॉकी आशिया चषक स्पर्धेसाठी केंद्र सरकारने पाकिस्तान संघाला खेळण्याची परवानगी दिली आहे. यापूर्वी भारतावर झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला होता. मात्र, आता केंद्र सरकारने पाकिस्तानच्या हॉकी संघाला भारतात येण्यास परवानगी दिल्याने उद्धवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती आणि पहलगाम हल्ल्यात निष्पाप जीव गमावलेल्यांच्या जखमा अजूनही ताज्या आहेत.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अजूनही पकडले गेलेले नाहीत.
त्या हल्ल्याच्या जखमा अजूनही भरून आलेल्या नाहीत…
पण केंद्र सरकारने २०२५ मध्ये भारतात होणाऱ्या हॉकी आशिया कपमध्ये पाकिस्तानला खेळण्यास मंजुरी दिली आहे.
ह्यानंतर पुढची पायरी म्हणजे बीसीसीआयने क्रिकेट आशिया कपमध्ये भारत-पाक…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 4, 2025
अशा परिस्थितीत क्रीडा मंत्रालयाने आशियाई हॉकी चषकासाठी पाकिस्तानला परवानगी दिली आहे. तसेच, बीसीसीआय देखील आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट सामने खेळणार आहे. ही बाब अत्यंत लज्जास्पद असल्याचे आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
हेही वाचा – IND vs ENG : सिराजने स्टोक्सला बाद करत रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच गोलंदाज
यासोबतच त्यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, “पाकिस्तानकडून दहशतवादावर निर्णायक कारवाई होईपर्यंत जाहिरातींद्वारे मिळणारे उत्पन्न रोखता येणार नाही का? दहशतवादाचा पाकिस्तानमधून समूळ उच्चाटन होईपर्यंत, पाकिस्तानला फायदा होईल अशा गोष्टींवर केंद्र सरकार ठाम राहू शकत नाही का?” असे सवाल त्यांनी आपल्या पोस्टद्वारे सरकारला विचारले आहेत. या पोस्टमुळे आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि क्रीडा क्षेत्रातील निर्णयांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.




