आदित्य ठाकरेंना अटक करून चौकशी करावी; नितेश राणेंची मागणी

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी नव्याने चौकशी करण्याची मागणी तिच्या वडिलांनी याचिकेतून केली आहे. दिशा सालियनचा बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी याचिकेतून केला आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून या प्रकरणाची नव्यानं चौकशी करण्याची मागणी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या मंत्र्याला तात्काळ अटक करुन त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज (गुरुवारी) सत्ताधारी आमदारांकडून विधानसभेत करण्यात आली. मंत्री नितेश राणे यांनी सरकारने याची दखल घ्यावी आणि दिशा सालियनच्या वडिलांनी घेतलेल्या नावांची चौकशी करावी असे म्हटले आहे.
काय म्हणाले नितेश राणे म्हणाले?
नितेश राणे म्हणाले, दिशा सालियनच्या वडिलांनी पिटीशन दाखल केले आहे. त्यानुसार आम्ही सभागृहात एवढी मागणी केली आहे की, महिलांवरती बलात्कार होतो, त्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घ्यावे आणि त्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे की, बलात्काराचा आरोप झाला तर त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक करत चौकशी करावी लागते. दिशाच्या वडीलांनी जे आरोप केले आहेत, त्यानुसार कारवाई झाली पाहिजे, हीच आमची मागणी आहे. सरकारने या सगळ्याची दखल घ्यावी असे आमचे म्हणणे आहे.
पुढे म्हणाले की, एसआयटीमधील अधिकारी चिमाजी आढाव हा त्या प्रकरणात सहभागी होता. मला कुणाच्या समोर बोलवताय, आम्हाला ज्या व्यक्तीवर संशय होता त्यालाच आम्ही पुरावे कसे देणार. या प्रकरणातील काही जणांना त्यांनी मदत केली, आणि आम्ही त्याला पुरावे दिले असते तर त्यांनी ते पुरावे आरोपींना दिले असते, SIT च्या अधिकाऱ्यांना काय पत्र दिले हे तुम्हाला माहिती आहे का? चिमाजी आढाव नावाचा एक अधिकारी यामध्ये केसमध्ये इन्व्हॉल्व्ह होता, त्याला केस मध्ये ठेवू नये असे म्हणालो होतो. आम्हाला ज्या व्यक्तीवर संशय होता त्यालाच आम्ही पुरावे कसे देणार. त्याच्या समोर चौकशीला मी कसे जाणार? असे पत्र मी एसआयटीला दिले होते, अशी माहिती नितेश राणे यांनी दिली आहे.
शिंदे गटाच्या आमदाराकडून आदित्य ठाकरेंची पाठराखण
दिशा सालियान हिचा मृत्यू चौदाव्या मजल्यावरून पडून पाच वर्षांपूर्वी झालेला आहे. दिशाचा करुण अंत झाला आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडीने) तपास केला. त्या काळात ज्या ज्या नेत्यांवर आरोप झाले होते, त्या पैकी एकाही नेत्याचा त्या प्रकरणात सहभाग आहे, असे तपासात यंत्रणांना आढळून आलेले नाही. दिशा सालियान तथाकथित खून प्रकरणात कोणत्याही ॲंगलने सहभाग दिसलेला नाही. तपास यंत्रणांवर विश्वास नसल्यामुळे दिशा सालियान हिचे कुटुंबीय आज उच्च न्यायालयात गेले आहेत. तपास यंत्रणांना उच्च न्यायालयाने पुन्हा तपासाचे आदेश दिले तरी त्यातून काही वेगळं निघेल, असे मला वाटत नाही, असा विश्वासही आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केला.
दिशा सालियनबाबत काय घडलं?
दरम्यान, दिशा सालियनचा मृत्यू झाला तेंव्हा ती मालाड येथील एका इमारतीत राहत होती. तिच्या मृत्यूनंतर सहा दिवसांनी, 14 जून 2020 रोजी, सुशांत सिंह राजपूतनेही आत्महत्या केली होती, ज्यामुळे दोन्ही प्रकरणांना जोडण्याचे प्रयत्न झाले होते. सुरुवातीला सालियन कुटुंबाने दिशाच्या मृत्यूला आत्महत्या मानले होते आणि कोणतीही तक्रार नसल्याचे म्हटले होते. मात्र, आता त्यांनी हायकोर्टात धाव घेऊन नवीन दावे केले आहेत, ज्यामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.




