आदित्य ठाकरे शहरी नक्षलवाद्यांचे प्रवक्ते आहेत; आशिष शेलार यांची टीका

मुंबई : धारावी प्रकल्पावर प्रश्न निर्माण करणारे निर्बुद्ध आदित्य शहरी नक्षलवाद्यांचे प्रवक्ते आहेत, अशी टीका मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली. विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आशिष शेलार यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
आशिष शेलार म्हणाले, धारावी पुनर्विकासातील 70 टक्के घरे सरकारच्या संस्थेअंतर्गत होणार आहेत. ही घरं दलित आणि मुस्लीम बांधवांची असू शकतात. त्यांना हक्काचे घर मिळण्यापासून परावृत्त करणं, त्यांच्यात एक वेगळी भावना निर्माण करून तुमच्याविरोधी सरकार आहे असे स्वत:चविरोध करून वातावरण निर्माण करणे हा त्यांचा नॅरेटीव्ह आहे, अशी टीका शेलार यांनी केली.
धारावीत अजूनही संपूर्णपणे सर्व्हे झालेला नाही. 2011 नंतर ज्यांना अपात्र म्हणू, असे निवासी आणि अनिवासी गाळे किती याचा सर्व्हेच पूर्ण झालेला नाही. आतापर्यंत 20 हजार घरांचा सर्व्हे झाला आहे. असे असतानाही जो भ्रम, खोटं आणि कट केला जात आहे. निर्बुद्ध आदित्य ठाकरे 7 घरांबाबत बोलत आहेत. हा आकडा त्यांनी आणला कुठून ? धारावीच्या शिवसेना शाखेत बसून खोटे आकडे तयार करण्याचे काम ते करत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.





