मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे हे मुंबईतील वांद्रे येथील सोफिटेल हॉटेलमध्ये साडेचार तास एकत्र होते. सूत्रांनुसार, शनिवारी संध्याकाळी सहापासून दोन्ही नेते हॉटेलमध्ये उपस्थित होते आणि त्यांच्यात अर्धा ते एक तास गुप्त चर्चा झाली. यावेळी हॉटेलच्या कॅफेटेरिया परिसर पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता आणि कुणालाही प्रवेश दिला गेला नाही. दोन्ही नेते वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी हॉटेलात आल्याचा दावा केला जात आहे. आदित्य ठाकरे प्रथम पोहोचले, तर एक तासानंतर फडणवीस आले. अधिवेशनादरम्यान फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या भेटीनंतर आता ही गुप्त बैठक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. दोन दिवसांपूर्वी फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना सत्ताधारी गटात येण्याची ऑफर दिली होती. त्यानंतर ही भेट शिंदे गटासाठी धक्कादायक मानली जात आहे. नेमकी काय चर्चा झाली, याबाबत गूढ कायम आहे. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण उदयाला येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.