Aaditya Thackeray : कोंबड्या चोरांना बर्फाच्या लादीवर झोपवणार; आदित्य ठाकरे यांची नारायण राणेंवर टीका

मालवण : महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचारासाठी युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे मालवणमध्ये आले होते, यावेळी त्यांनी भाजप खासदार नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली आहे. आमच्यावर टीका करण्यासाठी गेली 10 वर्षे पगार घेणारी बाटली गॅंग राजकोट किल्ल्यावर माज दाखवत होते. कोंबड्या चोरांना बर्फाच्या लादीवर झोपवणार, असा टोला देखील आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.
ठाकरे पुढे म्हणाले, गेल्या दोन महिन्यात एक फसवी योजना आणली आहे. लाडकी बहीण योजना. त्यांची घोषणा होती 15 लाख रुपये देण्याची, पण 2024 ला 1500 देतायेत, ते निर्लज्ज लोक आहेत. झाशीत एवढी दुर्घटना घडली तरी त्यांनी आपला एकही कार्यक्रम रद्द केला नाही. उद्या मंत्रालय देखील गुजरातमध्ये न्याल, त्यामुळे परिवर्तन करावे लागेल, असे ते म्हणाले.
ही निवडणूक आपल्याला साधी सोपी वाटत असली तरी सोपी नाही. वैभव नाईक यांच्यावर धमक्या, दबाव होता. पण वैभव नाईक निवडून येणार आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार होणार, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
गुजरातमध्ये मोदींनी रोड शो काढला, कारण महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये नेले. उध्दव ठाकरे यांच्यावर उद्योगपतीचा विश्वास आहे, आता सरकार पुन्हा आले की उद्योग राज्यात येतील, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.




