रायगडमध्ये आदिती तटकरे तर नाशिकमध्ये गिरीश महाजन करणार ध्वजारोहण

मुंबई : महायुतीचे सरकार येऊन आठ महिने झाल्यानंतरही अजूनही रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाचा तिढा कायम आहे. त्यामुळे यंदाच्या 15 ऑगस्टला या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री म्हणून झेंडा कोण फडकवणार? यावरून महायुतीत गेल्या काही दिवसांपासून रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
नाशिकमधील पालकमंत्रीपदावरून भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि रायगडमधील पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चढाओढ सुरू असल्याचे चित्र आहे. पण आता राज्य सरकारने 15 ऑगस्टला झेंडावंदन करणाऱ्या मंत्र्यांची नावे जाहीर केली असून रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले नाही तर मंत्री आदिती तटकरेच झेंडावंदन करणार आहेत. तर नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन झेंडा फडकवतील, अशी माहिती राज्य सरकारच्या परिपत्रकातून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
रायगडमध्ये गोगावलेंच्या हस्तेच झेंडावंदन व्हावे, अशी इच्छा शिवसेना शिंदे गटाकडून व्यक्त करण्यात आली होती. खुद्द उद्योग मंत्री उदय सामंत यांनी 15 ऑगस्टला फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांना ध्वजारोहण करण्याचा मान मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. पण त्यांची ही अपेक्षा अपूर्णच राहिली असून महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते १५ ऑगस्टला रायगडचे झेंडावंदन केले जाणार आहे, तशास्वरूपाचे परिपत्रक काढण्यात आले आहे.





