अधीर रंजन चौधरींचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

कोलकाता : आपल्याच पक्षात एकाकी पडलेले पश्चिम बंगाल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी अखेर आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. कॉंग्रेस कमिटीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीनंतर त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली. लोकसभा निवडणुकीत बंगालमध्ये झालेल्या कॉंग्रेस पक्षाच्या खराब कामगिरीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती.
दरम्यान, अधीर रंजन यांच्या राजीनम्याच्या बातमीला कॉंग्रेस पक्षाकडून कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. मात्र स्वत: त्यांच्या म्हणण्यानुसार ते केवळ पक्षाचे प्रदेशाध्यक्षच तर होते. मल्लिकार्जुन खर्गे कॉंग्रेसचे अध्यक्ष झाल्यापासून कोणीही प्रदेशाध्यक्ष नव्हते. जेंव्हा पूर्णवेळ अध्यक्षांची नियुक्ती केली जाईल तेंव्हा तुम्हाला सगळ्यांना ते कळेलच.
अधीर रंजन आणि खर्गे यांच्यात सुरूवातीपासून योग्य सूर जुळले नाहीत अशी चर्चा होती आणि आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरही हे मतभेद समोर आले होते. अधीर रंजन ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जात. निवडणुकीच्या तोंडावरही त्यांच्या ममतांवर हल्लाबोल सुरू होता. डाव्या पक्षांशी आघाडी करण्याबाबत ते जास्त अनुकूल होते असे मानले जाते.





