युरोपीय संघाकडून रशियावर अतिरिक्त निर्बंध

ब्रुसेल्स : रशियावर अतिरिक्त निर्बंध घालण्याचा प्रस्ताव युरोपीय संघाच्या दूतांनी मंजूर केला आहे. या निर्बंधांची अंमलबजावणी पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्याला २४ फेब्रुवारी रोजी तीन वर्षे पुर्ण होत आहेत. याच दिवशी रशियावरील हे वाढीव निर्बंध लागू होणार आहेत.
रशिया आणि युक्रेन दरम्यानचे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेच्या पुढाकाराने वाटाघाटी सुरू केल्या गेल्या असल्या तरी या वाटाघाटींकडे युरोपीय संघाने दुर्लक्ष करून रशियावर हे निर्बंध घातले आहेत. रशियाने २०२२ मध्ये युक्रेनवर आक्रमण केल्यापासून युरोपीय संघाने अनेकवेळा रशियावर निर्बंध घातले आहेत.
रशियाशी संबंधित सरकारी एजन्सी, बँका आणि संघटनांमधील २,३०० व्यक्ती आणि संस्थांना या निर्बंधांचा फटका बसला आहे. नव्याने घातल्या जाणाऱ्या निर्बंधांनुसार काही व्यक्तींना प्रवास बंदी, त्यांची मालमत्ता गोठवणे आणि व्यापारी निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र या व्यक्ती आणि संस्थांची नावे जाहीर केली गेलेली नाहीत.
युरोपीय संघाचे सदस्य असलेल्या २७ देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून या निर्बंधांना अंतिम मंजूरी अद्याप मिळालेली नाही. ही मंजूरी मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे. युरोपीय संघ आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांनी रशियाविरोधातल्या काही उपाययोजनांचा मसुदा तयार केला होता, हे नर्बंध स्वीकारले जाण्याचे त्यांनी स्वागत केले आहे.





