पुणे विभागाने बनविला आझाद हिंद एक्स्प्रेससाठी अतिरिक्त रेक

पुणे – हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेसला नेहमीच उशीर होऊ लागल्याने प्रवाशांचा खोळंबा होतो. त्यासाठी पुणे विभागाने त्यांच्याकडे असलेले सुट्टे रेक पासून एक अतिरिक्त रेक (रेल्वे गाडी) बनविला आहे. त्यामुळे आता पुण्यातून सुटणारी आझाद हिंद एक्स्प्रेस वेळेत सुटणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून हावडा-पुणे आझाद हिंद एक्सप्रेस (१२१३०) विविध कारणांमुळे उशिराने धावत होती. या गाडीसाठी सध्या चार रेक वापरले जातात. तरीही पुण्यात पोहचण्यास तिला उशीर होतो. अतिरिक्त कोच (पेअरिंग रेक) नसल्यामुळे हावडावरून गाडीला येण्यास उशीर झाल्यास पुणे-हावडा आझाद हिंद (१२१२९) ही सतत पुणे रेल्वे स्टेशनवरून उशीराने सुटत होती. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत.
प्रवाशांकडून त्याबाबत नेहमी तक्रारी केल्या जात होत्या. पुणे रेल्वे विभागाने पुणे-हावडा-पुणे या ट्रेनच्या त्याच रचनेसाठी मुख्यालय संचालन विभागाच्या मदतीने अतिरिक्त रेक (स्क्रॅच रेक) तयार केला. त्यासाठी पुणे विभागातील सुट्टे रेल्वे रेकचा वापर करून एक अतिरिक्त रेक बनविला आहे.
त्यामुळे आता पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस ही शुक्रवारी सायंकाळी सहा वाजून ३५ मिनिटांनी वेळेत सुटली. यापुढे पुणे विभागाकडे नेहमी एक अतिरिक्त कोच शिल्लक असल्यामुळे या गाडीला पुण्यातून सुटताना आता उशीर होणार नाही. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. असे पुणे रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रामपाल बरपग्गा यांनी सांगितले.





