पुणे जिल्हा | मंचर आगारासाठी जादा बस उपलब्ध कराव्यात

अवसरी, (वार्ताहर) – आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात तरुण, नागरिक, विद्यार्थी यांची पुणे येथे दररोज ये जा असल्याने मंचर एसटी आगारातून सुटणाऱ्या बस कमी पडत आहेत. बारा ज्योतिर्लिंगपैकी भीमाशंकर हे मंचरपासून साठ ते सत्तर किमी अंतरावर आहे.
दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढती संख्या लक्षात घेता, प्रवाशी नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मंचर एसटी आगारात नवीन २० ते २५ एस टी बस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आंबेगाव तालुक्यातील प्रवाशांनी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे.
आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली आहे. तसेच तालुक्यातील अनेक तरुण, तरुणी हे चाकण, खेड, भोसरी, पुणे यासारख्या ठिकाणी कामानिमित्त दररोज ये-जा करत असतात. अनेक नागरिक, महिला, व्यावसायिक यांची ही दररोज पुणे ते मंचर असा प्रवास असतो.
त्यामुळे दररोज सकाळी पुणे येथे जाण्यासाठी मंचर बस स्थानकावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. अनेकदा आळेफाटा, नारायणगाव, नाशिक वरून येणाऱ्या एसटी बस मध्ये गर्दी असल्याने अनेक प्रवाशांना पुणे येथे उभे राहून प्रवास करावा लागतो.
यामुळे अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. मंचर आगारात पुरेशा बस नसल्याने स्थानिक प्रवाशांना इतर वाहनांचा आधार घेऊन पुण्यापर्यंत प्रवास करावा लागतो.
त्यामुळे या प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मंचर एसटी आगरात २० ते २५ नवीन एसटी बस शासनातर्फे उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आंबेगाव तालुक्यातील प्रवाशांनी केली आहे. याबाबत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र दिले आहे.
राज्य शासनाने वतीने तब्बल २ हजार एसटीबस एसटी महामंडळास देण्यात येणार असून त्यापैकी २० ते २५ बस मंचर आगारात मिळाव्यात, अशी मागणी होत आहे.
भीमाशंकर – मंचर – त्रंबकेश्वर, भीमाशंकर ते शेगाव, मंचर ते पंढरपूर, मंचर ते तुळजापूर, मंचर ते गाणगापूर, मंचर ते मुंबई, लोणी ते मुंबई, मंचर ते भोसरी, पुणे ते वडगावपीर मुक्कामी, अशा एसटीच्या फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
अत्याधुनिक सेवेची मागणी
मंचर येथील नवीन सुरू झालेल्या एसटी आगारात खेड आगाराच्या दहा व नारायणगाव आगाराच्या दहा बस प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. मात्र, या गाड्या जुन्या व कालबाह्य झाल्याने अनेकदा रस्त्यावर बंद पडतात.
तालुक्यात नवीन एसटी आगार असूनही शैक्षणिक सहल व इतर कामासाठी पुणे या ठिकाणी बस बुकिंग करावे लागतात त्यामुळे या नवीन एसटी आगारात लवकरात लवकर २० ते २५ अत्याधुनिक बस उपलब्ध कराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.





