Maharashtra Politics : भाजपसोबत जाण्याच्या बैठकीला अदानी नव्हते; अजित पवारांनी घेतला यु – टर्न

मुंबई : 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भाजपसोबत जाण्याचा निर्णय झाला होता. त्यावेळी सत्तास्थापणेसाठी एका उद्योगपतीच्या घरात बैठक झाली होती. त्या बैठकीत अमित शाह, देवेंद्र फडणवीस, शरद पवार साहेब, प्रफुल पटेल यासह गौतम अदानी उपस्थित होते, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला होता.
अजित पवारांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली होती. मात्र आता अजित पवार यांनी त्यांच्या विधानावरून घुमजाव केले आहे. अशी कोणतीही बैठक तसेच मध्यस्थी झाली नसल्याचे अजित पवार म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवारांना पाच वर्षांपूर्वी गौमत अदाणी आणि अमित शहा यांनी मध्यस्थी केली होती का? याबाबत पत्रकारांनी अजित पवारांना विचारणा केली असता, त्यांनी अशी कोणतीही मध्यस्थी झाली नाही नसल्याचे सांगितले. त्यामुळे अजित पवारांनी 24 तासांच्या आत घुमजाव केले आहे.
राष्ट्रवादी आणि भाजपचे सरकार राज्यात आणण्यासाठी दिल्लीत पाच बैठका झाल्या. एक बैठक उद्योगपती गौतम अदानींच्या घरी झाली. यामधील एका बैठकीला अमित शाह, गौतम अदानी, देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल, पवार साहेब आणि मी स्वतः उपस्थित होतो. त्या गोष्टी सगळ्यांनाच माहिती आहेत, असे अजित पवार म्हणाले होते. त्या गोष्टी आता काढून काही उपयोग नाही. त्या गोष्टीचा सर्व दोष माझ्यावर आला. त्या गोष्टीची संपूर्ण जबाबदारी मी घेतली आणि इतर नेत्यांना वाचवले, असेही ते म्हणाले.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
अशी कोणतीही बैठक झाली याबाबत मला माहिती नाही. पहाटेच्या शपथविधीबाबत आम्हाला कुणालाच माहिती नव्हते. हे मी अनेकवेळा बोलले आहे. मला अजुनही तो दिवस आठवतो. मी झोपलेले होते. सदानंद सुळे यांनी मला उठवले आणि टीव्हीवर काय चालले ते बघायला सांगितले. त्यामुळे मला किंवा आमच्या पक्षाला त्या बैठकीबद्दल काहीही माहिती नाही, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. मीटिंग झाली की नाही? कुठे झाली? काय झाली? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे अजित पवारांनी द्यावीत. आम्हाला काही माहितीच नाही तर आम्ही उत्तर कुठून देणार, असेही त्या म्हणाल्या.
त्यांच्या सर्व गोष्टी खोट्या-शरद पवार
मी गौतम अदानी नव्हे तर रतन टाटा असो वा किर्लोस्कर यांच्यासह अनेकांच्या घरी जातो. जे महाराष्ट्रात औद्योगिक क्षेत्रात काम करू इच्छितात अशांच्या कामांना गती देणे, त्यांच्याशी सुसंवाद ठेवणे या गोष्टी राज्य म्हणून गरजेच्या असतात, असे शरद पवार म्हणाले. तसेच अजित पवारांनी सांगितलेली एकही गोष्ट सत्य नाही, असा खुलास शरद पवारांनी केला.





