Aditya Thackeray : “मुंबई पालिकेत लवकरच अदानी कर”; आदित्य ठाकरे यांचा फडणवीस सरकारला टोला !

Aditya Thackeray – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहमतीने मुंबई महापालिकेने सुधारित रेडी रेकनर दरानुसार मालमत्ताधारकांच्या मालमत्ता करात सुमारे 15 टक्के वाढ केली आहे. या वाढीव दरानुसार पालिकेने मालमत्ताधारकांना देयके पाठवली आहेत.
तर दुसरीकडे, घनकचरा व्यवस्थापन शुल्क स्थगित करण्यात आले आहे. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका तसेच फडणवीस सरकारला टोला लगाविला आहे.
मुंबई महापालिकेने सुधारित रेडी रेकनर दरानुसार मालमत्ताधारकांच्या मालमत्ता करात 15.89 टक्के दरवाढ केली आहे. त्याद्वारे महापालिकेला अंदाजे 930 कोटी रुपयांचे वाढीव उत्पन्न मिळणार आहे.
तर, मालमत्ता करामधील या सुधारित देयकांमुळे नागरिकांवर पडणारा अतिरिक्त भार लक्षात घेऊन प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन शुल्काचा पुनर्विचार करावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापन शुल्क स्थगित ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतलेला आहे.
मुंबईकरांवरील मालमत्ता कर वाढविल्यामुळे घनकचरा व्यवस्थापन शुल्क फक्त पुढे ढकलण्यात आले असून पालिकेने ते रद्द केलेले नाही, याकडे आमदार आदित्य ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे. घनकचरा व्यवस्थापन शुल्क हे अदानी कर असून त्याला माझा विरोध आहे.
अदानी समूहाकडील देवनार भूखंडाच्या स्वच्छतेसाठी होणाऱ्या 2500 कोटी रुपयांच्या खर्चाची अप्रत्यक्ष भरपाई करण्यासाठी हा कर मुंबईकरांवर आकारला जाणार आहे. म्हणजेच, ही सफाई मुंबईच्या पैशातून होईल, असा दावाही त्यांनी केला.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने मुंबईतील 500 चौरस फूट घरांसाठी मालमत्ता कर विनाअट रद्द केला होता. पण आता आता, भाजप सरकारने मालमत्ता कर वाढवला असून लवकरच अदानी कर (घनकचरा व्यवस्थापन शुल्क) लागू करेल, असा दावाही त्यांनी केला आहे.





