Adani Group : हरित ऊर्जा प्रकल्पावर परिणाम नाही, टोटल एनर्जीच्या निर्णयानंतर अदानी समूहाचे स्पष्टीकरण…

नवी दिल्ली – अदानी समूहातील अदानी ग्रीन एनर्जी आणि इतर हरित ऊर्जा प्रकल्पात बरीच गुंतवणूक असलेल्या फ्रान्सच्या टोटल एनर्जी या कंपनीने आपली आगामी गुंतवणूक स्थगित केली आहे. यामुळे अदानी ग्रीन एनर्जी किंवा इतर कोणत्याही कंपन्यांच्या कामकाजावर फारसा परिणाम होणार नाही असे अदानी उद्योग समूहाने शेअर बाजारांना कळविले आहे.
अदानी उद्योग समूहातील काही अधिकार्यावर न्यूयॉर्क येथील न्यायालयात आरोप दाखल केल्यानंतर टोटल एनर्जी या कंपनीने जोपर्यंत या आरोपासंदर्भातील निकाल लागत नाही तोपर्यंत गुंतवणूक थांबविण्यात आली असल्याचे म्हटले आहे. अदानी ग्रीन एनर्जीने शेअर बाजाराला कळविलेल्या माहितीत म्हटले आहे की, फ्रान्सच्या कंपनीबरोबर सध्या तरी गुंतवणुकीबाबत कसल्याही प्रस्तावावर चर्चा चालू नाही.
त्यामुळे अदानी ग्रीन एनर्जीच्या कामकाजावर परिणाम होणार नाही. अमेरिकेत झालेल्या आरोपात अदानी ग्रीन एनर्जीचा कसलाही संबंध नाही याकडे लक्ष वेधण्यात आले. फ्रान्सच्या टोटल एनर्जी या कंपनीचे आदानी ग्रीन एनर्जीमध्ये 19.75% गुंतवणूक आहे. त्याचबरोबर अदानी ग्रीन एनर्जीच्या इतर दोन हरित ऊर्जा प्रकल्पात टोटल एनर्जीची 50% गुंतवणूक आहे.
पतमानांकन संस्थांची नकारघंटा
आरोपामुळे आता पतमानांकन संस्थांनी अदानी समूहाबाबत नकारात्मक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. अदानी समूहातील 11 पैकी सात कंपन्यांचा महसूल भविष्यात नकारात्मक पातळीवर राहील असे मुडीज् या पतमानांकन संस्थेने म्हटले आहे. फिट्च या दुसर्या पतमानांकन संस्थेने अदानी समूहाच्या काही रोख्याबाबत नकारात्मक परतावा येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे अदानी समूहाला गुंतवणूक आकर्षक आकर्षित करणे तुलनेने अवघड जाणार आहे. या आरोपातील पुढील प्रक्रियाकडे पतमानांकन संस्थांनी लक्ष द्यायचे ठरविले आहे.
Adani Group : अमेरिकेतील खटल्याचा परिणाम नाही, विस्तारीकरणासाठी पुरेसे भांडवल उपलब्ध – अदानी समूह
अदानी समूहाचे शेअर कोसळले
अशा परिस्थितीत या समूहातील सर्व कंपन्यांच्या शेअरच्या भावात मंगळवारी घट झाली. अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअरचा भाव सात टक्क्यांनी, अदानी एंटरप्राईजेसच्या शेअरचा भाव 4.78 टक्क्यांनी, अदानी एनर्जी सोल्युशनच्या शेअरचा भाव चार टक्क्यांनी, अदानी टोटल गॅस कंपनीच्या शेअरचा भाव साडेतीन टक्क्यांनी, अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअरचा भाव तीन टक्क्यांनी, अदानी विल्मर कंपनीच्या शेअरचा भाव अडीच टक्क्यांनी, अंबुजा सिमेंट कंपनीच्या शेअरचा भाव 2.30 टक्क्यांनी, अदानी पावर कंपनीच्या शेअरचा भाव दोन टक्क्यांनी, संधी इंडस्ट्रीजच्या शेअरचा भाव दोन टक्क्यांनी, एससीसी कंपनीच्या शेअरचा भाव 1.37 टक्क्यांनी, एनडीटीव्ही कंपनीच्या शेअरचा भाव 0.01 टक्क्याने कमी झाला.





