Adani group | Congress | Narendra Modi – भाजपला बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीतील पराभव दिसू लागला आहे. त्यातून मोदी सरकारने त्या राज्यातील १ हजार ५० एकर जागा आधीच अदानी समुहाला गिफ्ट केली, असा आरोपवजा दावा कॉंग्रेसने केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी बिहारचा दौरा केला. त्या दौऱ्याच्या दिवशीच कॉंग्रेसचे नेते पवन खेडा यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आरोपांची सरबत्ती केली. भाजपला निवडणूक हरण्याची जाणीव झाल्यावर अदानी समुहावर आधीच मोठ-मोठ्या प्रकल्पांची खैरात केली जाते. त्याबाबतची यादी खूप मोठी आहे. महाराष्ट्रात निवडणूक होण्याआधी त्या समुहाला धारावी आणि वीज प्रकल्प देण्यात आले. झारखंड, छत्तीसगढमध्येही तसेच घडले. आता बिहारच्या भागलपूरमध्ये अदानी समुहाला हजार एकर जागा आणि १० लाख झाडे बहाल करण्यात आली आहेत. वीज प्रकल्पाच्या उभारणीसाठी वर्षाला १ रूपये दराने ३३ वर्षांसाठी तो करार लागू असेल. संबंधित प्रकल्प २ हजार ४०० मेगावॅट क्षमतेचा असेल. त्याच्या उभारणीसाठी २१ हजार ४०० कोटी रूपये खर्च येईल. त्याविषयीची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पाचा भाग म्हणून करण्यात आली. त्यावेळी सरकार स्वत:च प्रकल्प उभारणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, सरकारने माघार घेत तो प्रकल्प अदानी समुहाकडे सोपवला, असे त्यांनी म्हटले. जमीन बिहारची, पैसा बिहारचा, कोळसा बिहारचा आणि कंत्राट मात्र अदानी समुहाला. शेतकऱ्यांची जमीन जबरदस्तीने, त्यांना धमकावून घेण्याचा मार्ग अवलंबण्यात आला. प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी मोदी येणार असल्याने अनेक शेतकऱ्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. त्यांनी विरोध करू नये यासाठी तसे केले गेले. संबंधित प्रकल्पातील वीज बिहारमधील जनतेला प्रति युनिट ६.७५ रूपये दराने विकली जाईल. तो दर इतर राज्यांत कितीतरी कमी आहे, याकडेही खेडा यांनी लक्ष वेधले. त्यांनी केलेल्या आरोपांवर केंद्र आणि बिहारमधील सत्ताधाऱ्यांची तसेच अदानी समुहाची तातडीने प्रतिक्रिया मिळू शकली नाही.