Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकसाठी अदानी समूह असणार भारतीय संघाचा मुख्य प्रायोजक….

Paris Olympics 2024 : – पॅरिस २०२४ ऑलिम्पिकसाठी अदानी समूह भारतीय संघाचा मुख्य प्रायोजक बनला आहे. खुद्द अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी ही घोषणा केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X च्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी सोमवारी त्यांनी देशाचे साँग कॅम्पेन सुरू केले आणि डॉक्युमेंटरी लाँच केली.
ते म्हणाले, ‘आम्ही 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी सज्ज आहोत. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा मंचावर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व खेळाडूंना मी शुभेच्छा देऊ इच्छितो. खेळाडूंचे अथक परिश्रम आणि अटल समर्पण हे भारताच्या कधीही हार न मानणाऱ्या भावनेचे प्रतीक आहे. मला विश्वास आहे की यावेळी आपण ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक पदके जिंकू. अदानी समूहाने बॉक्सिंग, कुस्ती, टेनिस, भालाफेक, नेमबाजी, धावणे, शॉट पुट, तिरंदाजी यासह इतर खेळांमधील २८ खेळाडूंना समर्थन दिले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेते कुस्तीपटू रवी कुमार दहिया आणि दीपक पुनिया आणि बॉक्सर अमित पंघाल यांनाही अदानी समूहाकडून मदत मिळाली आहे. रवीने २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदक जिंकले आहे, तर दीपक पुनियाने २०२३ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे.
ऑलिम्पिक २६ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत होणार
यावेळी ऑलिम्पिक स्पर्धा २६ जुलै ते ११ ऑगस्टदरम्यान फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे होणार आहेत. यामध्य१२० खेळाडू सहभागी होत आहेत. बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू आणि टेबल टेनिस स्टार शरथ कमल यांची पॅरिस ऑलिम्पिकसाठी ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच, २०१२ चा कांस्यपदक विजेता नेमबाज गगन नारंगला पॅरिसमधील आगामी स्पर्धेसाठी मेरी कोमच्या जागी शेफ-डी-मिशन म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राच्या नेतृत्वाखाली२८ खेळाडू अथलेटिक्समध्ये सहभागी होणार आहेत.
भारताने २०३६ मध्ये ऑलिम्पिकचे आयोजन करण्याचा दावा केला
२०३६ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक गेम्ससाठी भारत दावा करू शकतो. हे लक्षात घेऊन गुजरात ऑलिम्पिक संघटना आणि गुजरात सरकार तयारी करत आहे. तेथे विविध खेळांसाठी क्रीडा संकुल बांधले जात आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही २०३६ मध्ये ऑलिम्पिकचे आयोजन करण्याचा दावा अनेकदा केला आहे.





