अदानी समूहाला केनियाकडूनही झटका; विमानतळ, ऊर्जा प्रकल्प केले रद्द

नवी दिल्ली/नैरोबी – भारतातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांना आणखी एक झटका बसला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या न्यायालयात गौतम अदानी यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा खटला दाखल झाला. त्यानंतर आता केनिया सरकारने समूहाला दुसरा झटका दिला आहे. केनिया सरकारने अदानींच्या प्रस्तावित विमानतळ विस्तार आणि ऊर्जा प्रकल्पांना रद्द केले आहे. या प्रकल्पांसाठी अदानी समूहाने बोली लावली होती. ऊर्जा क्षेत्राशी निगडित प्रकल्पाची किंमत ७०० दशलक्ष डॉलर तर ऊर्जा प्रकल्पाची किंमत १.८ अब्ज डॉलर असल्याचे सांगितले जात आहे.
केनियाचे राष्ट्राध्यक्ष विल्यम रुटो यांनी संसदेत सांगितले की, वाहतूक आणि ऊर्जा व पेट्रोलियम मंत्रालयाला मी हे प्रकल्प तात्काळ रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. आपल्या सहयोगी देशातील तपास यंत्रणांनी महत्त्वाची माहिती दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात येत आहे. रुटो यांनी ही घोषणा केल्यानंतर संसदेत उपस्थित खासदारांनी या निर्णयाचे स्वागत केले.
एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार राष्ट्राध्यक्ष रुटो संसदेत म्हणाले, भ्रष्टाराचाराबद्दल समोर आलेले पुरावे आणि विश्वासार्ह माहितीच्या आधारावर मी निर्णय घेण्यास मी मागेपुढे पाहणार नाही. केनियामध्ये ३० वर्षांपासून विमानतळाचे नियंत्रण करणाऱ्या कंपनीशी अदानी समूहाने भागीदारी करत नैरोबीमधील मुख्य विमानतळाचे आधुनिकीकरण करण्यासाठी करार केला होता. अतिरिक्त धावपट्टी आणि टर्मिनल बांधून देण्यासाठी करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या.
अदानी समूहाशी भागीदारी केल्यामुळे केनियातील मूळ कंपनीविरोधात गेल्या काही काळापासून निदर्शने सुरू होती. सप्टेंबर महिन्यात विमानतळ कर्मचाऱ्यांनीही बंद पुकारला होता. या करारामुळे त्यांच्या नोकऱ्यांवर गदा येईल आणि कामाच्या ठिकाणी अडचणी निर्माण होतील, असा आरोप कामगार संघटनांनी केला होता.





