Adam Zampa : आयसीसीने ऑस्ट्रेलियन स्पिनरला फटकारले, सामन्यादरम्यान शिवीगाळ करणे पडले महागात

सामन्यादरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या 37व्या षटकात झाम्पाने आपल्या गोलंदाजीवर मिसफील्ड आणि ओव्हरथ्रो झाल्यावर असभ्य भाषेचा वापर केला. ही बाब मायक्रोफोनमध्ये टिपली गेली आणि प्रसारणादरम्यान ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. ज्यामुळे आयसीसीने त्याच्यावर कठोर कारवाई केली आहे.
आयसीसीने केली कठोर कारवाई –
Australia bowler guilty in breach of ICC Code of Conduct during first ODI against South Africa.https://t.co/BkvHkwa2gZ
— ICC (@ICC) August 20, 2025
या घटनेनंतर आयसीसीने कठोर पावले उचलत बुधवारी ॲडम झाम्पाला आचारसंहितेच्या अनुच्छेद 2.3 अंतर्गत दोषी ठरवले, जे आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान असभ्य भाषेच्या वापराशी संबंधित आहे. आयसीसीच्या मते, या प्रकरणात औपचारिक सुनावणीची आवश्यकता नव्हती, कारण झाम्पाने आपला अपराध कबूल केला.
हेही वाचा – Babar Azam : बाबर-रिझवानला पीसीबीचा मोठा धक्का! आशिया कपच्या संघानंतर सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये दिला झटका
झाम्पाच्या खात्यात डिमेरिट गुणाची भर –
आयसीसीने स्पष्ट केले की, गेल्या 24 महिन्यांत झाम्पाचा हा पहिला अपराध आहे. त्यामुळे त्याच्या अनुशासनात्मक रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट गुण जोडण्यात आला. लेव्हल 1 च्या उल्लंघनासाठी किमान शिक्षा म्हणून औपचारिक फटकार, तर कमाल शिक्षा म्हणून खेळाडूच्या सामन्याच्या मानधनात 50 टक्के कपात आणि एक किंवा दोन डिमेरिट गुण असू शकतात.
सामन्याबद्दल बोलायचे तर दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 8 गडी गमावून 296 धावा केल्या. एडन मार्करमने सर्वाधिक 82 धावांची खेळी केली, तर कर्णधार टेंबा बावुमाने 65 आणि मॅथ्यू बीट्झके याने 57 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने 4, तर बेन ड्वारशुइसने 2 गडी बाद केले. ॲडम झाम्पाने 10 षटकांत 1 गडी बाद केला.
हेही वाचा – ICC ODI Rankings : ‘…म्हणून रोहित-विराटचं नाव वनडे क्रमवारीतून गायब’, आयसीसीने दिले स्पष्टीकरण
प्रत्युत्तरात 297 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणारा ऑस्ट्रेलियन संघ 41 षटकांत 198 धावांतच गारद झाला. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाने 98 धावांनी विजय मिळवला. कर्णधार मिचेल मार्शने 88 धावा केल्या, पण अन्य कोणत्याही फलंदाजाला अर्धशतक करता आले नाही. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराजने 5 गडी बाद करत सामन्यात वर्चस्व गाजवले.





