‘तू खरचं राष्ट्रीय पुरस्कारासाठी पात्र आहेस’, मृणाल ठाकूरने केले ‘या’ मराठी अभिनेत्याचे कौतुक

Mrunal Thakur Praises Adinath Kothare: अभिनेता आदिनाथ कोठारेची प्रमुख भूमिका असलेला ‘पाणी’ हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदिनाथनेच केले आहे. तर अभिनेत्री प्रियंका चोप्रा चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटातील आशयामुळे याचे प्रचंड कौतुक झाले होते. चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. आता प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल ठाकूरने या चित्रपटाचे कौतुक केले आहे. तसेच, सर्वांनी हा चित्रपट नक्की पाहावा, असे म्हटले आहे.
मराठावाड्यातील नागदरवाडी गावात असणारी पाणीटंचाई घालवण्यासाठी काम केलेल्या हनुमंत केंद्रे यांच्यावर ‘पाणी’ हा चित्रपट आधारित आहे. मराठवाड्यातील भीषण पाणीटंचाईचे मांडलेले वास्तव त्यामुळे सर्वच स्तरावर चित्रपटाचे विशेष कौतुक झाले. चित्रपटाला 66व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये पर्यावरणावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार देखील प्राप्त झाला होता.
अभिनेत्री मृणाल ठाकरूने या चित्रपटाचे कौतुक करत इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मृणाल म्हणाली की, आदिनाथ तू ‘पाणी’ सिनेमात खूपच चांगलं काम केले आहेस. एक अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून तुझं काम खूपच जबरदस्त आहे. राष्ट्रीय पुरस्कारासाठी तू खरचं पात्र ठरतोस. प्रियंका चोप्रा कथानक सांगण्याची तुझी आवड आणि सामाजिक बदल घडवून आणेल अशा चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी मला नेहमीच तुझे कौतुक वाटते. तू एक खरी लीडर असून, माझी नेहमीच आदर्श राहिलेली आहेस. सुबोध भावे, ऋचा वैद्य आणि संपूर्ण टीमचं अभिनंदन.
यासोबतच, तिने सर्वांनी हा चित्रपट नक्की पाहावा असेही म्हटले आहे. सध्या ‘पाणी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हीडिओवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.





