अभिनेत्री काश्मीरा कुलकर्णीला शूटींगदरम्यान दुखापत

Kashmira Kulkarni | अभिनेत्री काश्मीरा कुलकर्णीला ‘वामा-लढाई सन्मानाची’च्या सेटवर एका ॲक्शन सीनच्या शूटींगदरम्यान दुखापत झाली आहे. चित्रीकरणादरम्यान एक बिअरची बाटली-तिच्या हातावर फुटणार होती. मात्र काही त्रुटीमुळे चुकून तिच्या कपाळावर आदळली. ज्यानंतर सर्वांची धावपळ झाली. दुखापतीनंतर काश्मीराने त्वरित आइस थेरपी घेतली. फक्त एक तास विश्रांती घेऊन तिने चित्रीकरण पुन्हा सुरू केले.
‘वामा-लढाई सन्मानाची’ या चित्रपटाच्या मुख्य कलाकारांमध्ये काश्मिरा जी. कुलकर्णी, महेश वान्वे, जुई बी आणि इतरांचा समावेश आहे. महिला सक्षमीकरणावर एक शक्तिशाली संदेश देणे हा या चित्रपटाचा उद्देश आहे. लैंगिक समानता आणि महिलांना भेडसावणारे प्रश्न यावर हा चित्रपट भाष्य करतो.
या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि संकल्पना अशोक आर. कोंडके यांनी केले आहे आणि ओमकारीश्वर प्रॉडक्शनच्या बॅनरखाली सुब्रमण्यम के. यांनी निर्मिती केली आहे. चित्रपटाचे छायाचित्रण धीरज काटकाडे यांनी केले असून संवाद तरंग वैद्य यांनी लिहिले आहे. ‘वामा-लढाई सन्मानाची’ हा चित्रपट एप्रिल 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
यापूर्वी देखील कश्मिरा कुलकर्णीला चित्रीकरणादरम्यान स्टंट करताना दुखापत झाल्याची घटना घडली होती. कलर्स मराठीवरील ‘काव्यांजली’ मालिकेतील एका सीनमध्ये स्टंट करताना तिच्या पायाला जोरात लागले होते. या सीनचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर करत दुखापत झाल्याची माहिती दिली होती.





