Akshara Singh : अभिनेत्री ‘अक्षरा सिंग’वर अटकेची टांगती तलवार; कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक, काय आहे नेमकं प्रकरण? वाचा…

Akshara Singh : भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंगवर अटकेची टांगती तलवार सुरु झाली आहे. खगरिया न्यायालयात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले असून, ते पाटणा आणि मुंबईतील निवासस्थानी पाठवले जाणार आहे. अक्षरा सिंगच्या विरोधात खगरिया दिवाणी न्यायालयात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले असून, त्यामुळे तिच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
त्यामुळे आता अभिनेत्रीला अडचणी निर्माण होऊ शकतात. अक्षरा विरोधात हे वॉरंट चार वर्षांपूर्वीच्या तक्रारीवरून जारी करण्यात आले आहे. या प्रकरणात, ADJ-5 खगरिया येथे 12 मार्च 2020 रोजी त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता, जो न्यायालयाने फेटाळला होता. हे अजामीनपात्र वॉरंट खगरिया दिवाणी न्यायालयाच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी हिम शिखा मिश्रा यांच्या न्यायालयाने जारी केले आहे.
पैसे घेऊन कार्यक्रमाला हजेरी लावली नाही
चार वर्षांपूर्वी 8 जुलै 2018 रोजी खगरिया येथील जेएनकेटी मैदानावर शहीद किशोर कुमार मुन्ना यांच्या नावाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी अभिनेत्री अक्षरा सिंगला आयोजक शुभम कुमार यांनी बोलावले होते. यासाठी तिला लाखोंची आगाऊ रक्कम देण्यात आली होती.
त्यासाठी या अभिनेत्रीनेही कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. मात्र कार्यक्रमापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ जारी करून येण्यास नकार दिला होता. या कार्यक्रमासाठी आयोजकांकडून मोठी बुकिंग करण्यात आली होती, त्यातील पैसे शहीदांच्या कुटुंबीयांना देण्यात येणार होते, असे सांगण्यात येते.
पाटणा आणि मुंबईतील निवासस्थानी वॉरंट पाठवणार
या प्रकरणी तक्रारदार शुभम कुमार यांच्या वतीने न्यायालयात तक्रार दाखल करणारे ज्येष्ठ वकील अजिताभ सिन्हा यांनी सांगितले की, अजामीनपात्र वॉरंट 6 सप्टेंबर रोजी जारी करण्यात आले आहे.
त्यांनी सांगितले की, अभिनेत्री अक्षरा सिंगच्या पाटणा आणि मुंबईच्या पत्त्यांवर वॉरंट पाठवण्यासाठी त्यांच्या वतीने न्यायालयात अपील करण्यात आले होते, जे न्यायालयाने मान्य केले आहे. जर तिने खगरिया न्यायालयात आत्मसमर्पण केले नाही तर पोलीस तिला अटक करून न्यायालयात हजर करतील, असे त्यांनी सांगितले.





