Sharad Kapoor: अभिनेता शरद कपूरचे आवाहन अन् थेट मिळाली हॉलीवूड चित्रपटाची ऑफर
Sharad Kapoor: . बार्सिलोनामध्ये फुटबॉल खेळताना शरद कपूर यांच्या पायाला झाली दुखापत

Sharad Kapoor: ‘जोश’ चित्रपटातील अभिनेते शरद कपूर यांचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात त्यांची अवस्था पाहून अनेकांनी चिंता व्यक्त केली होती. मात्र त्यानंतर त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत सिनेसृष्टीतील लोकांकडे काम मिळवून देण्यासाठी मदतीचं आवाहन केलं होतं. त्यानंतर आता शरद कपूरला थेट हॉलीवूड चित्रपटाची ऑफर मिळाल्याचे काही वृत्तांद्वारे समोर येत आहे.
शरद कपूर बराच काळ मोठ्या पडद्यापासून दूर होते. त्यामुळे त्यांना पुन्हा अभिनय क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती. यासाठी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सिनेसृष्टीतील कलाकार आणि निर्मात्यांना काम देण्याचं आवाहन केलं होतं. शरद यांनी सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनकडे काम मिळवून देण्यासाठी मदत मागितली होती. मला चांगल्या कामाची गरज आहे. मला आर्थिक मदत नको, पुन्हा अभिनय करण्याची संधी हवी आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
त्यानंतर आता शरद कपूर यांना एका हॉलिवूड चित्रपटाची ऑफर मिळाली असून जानेवारी 2027 मध्ये या चित्रपटाचं शूटिंग सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, हा त्यांचा पहिलाच हॉलिवूड चित्रपट असणार आहे. याबद्दल आनंद व्यक्त करताना त्यांनी सांगितलं की, ‘हॉलिवूड प्रोजेक्टसोबतच मला बॉलिवूडमध्येही काम करायचं आहे. ही माझी इंडस्ट्री आहे आणि इथल्या लोकांना मी माझं कुटुंब मानतो, ‘ असंही त्यांनी स्पष्ट केलं. शरद शेवटचे जानेवारी २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ऋचा चड्डा स्टारर ‘कॅबरे’ या चित्रपटात दिसले होते.
सात वर्षे न्यूयॉर्कमध्ये होते वास्तव्यास
शरद कपूर यांनी मुलाखतीत सांगितलं की, ‘गेल्या सात वर्षांपासून मी न्यूयॉर्कमध्ये राहत होतो. साधारण वर्षभरापूर्वी भारतात परतलो. त्यामुळे भारतीय मनोरंजनविश्वात पुन्हा काम मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागत होते. काम मागण्यात मला कोणतीही लाज वाटत नाही. चांगलं काम मिळावं, एवढीच माझी इच्छा आहे. मला कोणतीही आर्थिक मदतीची गरज नाही आणि त्यांनी कधीही पैशांसाठी चित्रपट निवडलेले नाहीत.’
फुटबॉल खेळताना झाली दुखापत
आपल्या प्रकृतीबाबत सांगताना शरद कपूर म्हणाले की, ‘बार्सिलोनामध्ये फुटबॉल खेळताना दुसऱ्या खेळाडूचा पाय माझ्या पायाला लागला आणि गंभीर दुखापत झाली. त्यामुळे मला डॉक्टरांनी दोन महिने बेड रेस्ट करण्याचा सल्ला दिला आहे. याच दुखापतीमुळे मला माझ्या चार पाळीव कुत्र्यांची योग्य काळजी घेणंही शक्य होत नव्हतं. त्यामुळे काही काळासाठी कुत्र्यांना एनिमल शेल्टरमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला.’
दरम्यान, शरद कपूर मुंबईतील सध्याचं घर विकून मड आयलंड परिसरातील सात बेडरूमच्या मोठ्या बंगल्यात राहायला जाणार आहे. या घरात त्यांच्या पाळीव कुत्र्यांना पुरेशी जागा मिळेल आणि त्यांना चांगल्या पद्धतीने वावरता येईल, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा:





