Randeep Hooda : अभिनेता रणदीप हुड्डा ५० व्या वर्षी झाला बाबा.! पत्नी लिन लैशरामने दिला गोंडस मुलीला जन्म
रणदीप हुड्डा हा बॉलीवूडमधील सर्वात दमदार आणि प्रयोगशील अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. वास्तववादी अभिनय आणि गंभीर भूमिकांसाठी तो विशेष ओळखला जातो.

Randeep Hooda : बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डा याच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. रणदीप आणि त्याची पत्नी, अभिनेत्री लिन लैशराम यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. मंगळवार, १० मार्च २०२६ रोजी लिन लैशरामने गोंडस मुलीला जन्म दिला.
रणदीपने स्वतः इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली. लग्नानंतर सुमारे अडीच वर्षांनी या जोडप्याने त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे.
बाळाच्या जन्मामुळे हुड्डा कुटुंबात आनंदाचे वातावरण असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. रणदीपने शेअर केलेल्या फोटोंमध्ये एका फोटोमध्ये त्यांचे वडील नातीला कवेत घेताना दिसतात, तर दुसऱ्या फोटोमध्ये चिमुकलीचा छोटासा हात दिसतो.
पोस्टमध्ये रणदीपने भावनिक शब्दांत लिहिले, “आजोबा आणि नातीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. बाबा, आज मी स्वतः बाबा झाल्यानंतर तुमच्याबद्दलचा आदर आणखी वाढला आहे.
आणि लिन, मला बाबा बनवल्याबद्दल धन्यवाद. एक चिमुकली मुलगी आणि आयुष्यभराचं प्रेम.” विशेष म्हणजे, रणदीपच्या वडिलांच्या वाढदिवशीच मुलीचा जन्म झाल्याने हा क्षण कुटुंबासाठी अधिक खास ठरला आहे.
रणदीप हुड्डा आणि लिन लैशराम यांचा विवाह :
रणदीप हुड्डा आणि लिन लैशराम यांनी २९ नोव्हेंबर २०२३ रोजी मणिपूरमधील इम्फाळ येथे पारंपरिक मेइतेई पद्धतीने विवाह केला होता. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. लग्नात रणदीपने पारंपरिक मणिपुरी पोशाख परिधान केला होता, तर लिनने ‘पोटलोई’ हा पारंपरिक वेश परिधान केला होता.
View this post on Instagram
रणदीप हुड्डा कोण आहे?
रणदीप हुड्डा हा बॉलीवूडमधील सर्वात दमदार आणि प्रयोगशील अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. वास्तववादी अभिनय आणि गंभीर भूमिकांसाठी तो विशेष ओळखला जातो. रणदीपने २००१ मध्ये मॉनसून वेडिंग या आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
सुरुवातीच्या काळात त्याने अनेक वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिका निवडल्या. व्यक्तिरेखेसाठी शरीरयष्टीत मोठे बदल करण्यासाठी प्रसिद्ध आणि वास्तववादी भूमिकेसाठी अभिनेत्याची खास ओळख आहे. अभिनयाबरोबरच रणदीपला घोडेस्वारीची विशेष आवड असून तो राष्ट्रीय स्तरावरील इक्वेस्ट्रियन स्पर्धांमध्येही सहभागी झाला आहे.
एकूणच, वैयक्तिक आयुष्यातील या नव्या पर्वासह रणदीप हुड्डाच्या आयुष्यात आनंदाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. चाहत्यांसाठीही ही आनंदाची बातमी ठरली असून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.





