Actor Adinath Kothare : अभिनेता आदिनाथ कोठारेने सांगितली ‘सिस्टम’च्या कास्टिंगची रंजक गोष्ट
Actor Adinath Kothare : अश्विनी अय्यर तिवारींसोबत काम करण्याचं स्वप्न पूर्ण

Actor Adinath Kothare : टेलिव्हिजन, चित्रपट आणि ओटीटी या तिन्ही माध्यमांत आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता आदिनाथ कोठारे सध्या विविध प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहे. हिंदी आणि मराठी मनोरंजन विश्वात वैविध्यपूर्ण भूमिका साकारत आदिनाथने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
ॲमेझॉन प्राईमवरील ‘सिस्टम’ या चित्रपटात आदिनाथने साकारलेली ‘आलोक’ ही भूमिका विशेष चर्चेत असून, या प्रोजेक्टच्या कास्टिंगमागची रंजक गोष्ट त्याने नुकतीच सोशल मीडियावर शेअर केली आहे. मनापासून मॅनिफेस्ट केलेली गोष्ट कधीतरी प्रत्यक्षात उतरते, याचा अनुभव या निमित्ताने आल्याचं त्याने सांगितलं.
‘सिस्टम’मधील अनुभवाविषयी बोलताना आदिनाथ म्हणाला, “एका बॉलिवूड अवॉर्ड फंक्शनदरम्यान माझी भेट दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी यांच्याशी झाली. त्यावेळी मी त्यांना तुमच्यासोबत काम करण्याची इच्छा असल्याचं सहज बोलून गेलो. विशेष म्हणजे दुसऱ्याच दिवशी मला कास्टिंगसाठी फोन आला. ‘सिस्टम’साठी माझं ऑडिशन झालं आणि मी या चित्रपटाचा भागही झालो. आपण मनापासून मॅनिफेस्ट केलेल्या गोष्टी पूर्ण होतात, याचा हा माझ्यासाठी खास अनुभव होता.”
‘सिस्टम’मध्ये आदिनाथने ‘आलोक’ ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली असून, त्याने ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर तसेच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे.
दरम्यान, आगामी काळात आदिनाथ अनेक बिग बजेट बॉलिवूड प्रोजेक्ट्समध्ये झळकणार असल्याची चर्चा आहे. ‘रामायण’ आणि ‘गांधी’ यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्येही तो दिसणार असल्याची माहिती समोर येत आहे.





