Pune | महाविकास आघाडीचे कार्यकर्ते अजूनही धक्क्यात !

पुणे, – विधानसभा निवडणुकीत पराभव पदरी पडलेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. महाविकास आघाडीला शहरात सकारात्मक वातावरण असतानाही उमेदवारांना पराभव सहन करावा लागला. “हे निकाल मनाला न पटणारे असून, निकालात फेराफार झाले आहेत का?’ अशी शंका कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. पराभूत उमेदवारांचे हे कार्यकर्ते गेल्या दोन दिवसांपासून वारंवार एकमेकांची भेट घेत “असा निकाल लागलाच कसा’ यावर मंथन करत आहेत.
अगदी सहा महिने आधी लोकसभा निवडणुका झाल्या. यात पुण्यात भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे सव्वा लाख मतांनी विजयी झाले असले, तरी पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात काॅंग्रेसला मताधिक्य होते. तर, शिवाजीनगर मतदारसंघात तीन हजारांच्या आसपास मताधिक्य होते. खडकवासला आणि हडपसर मतदारसंघात मतदारांनी आपला कौल सरळसरळ महाविकास आघाडीच्या उमेदवारांना दिला. त्यामुळे खडकवासला, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोंन्मेंट या मतदारसंघांत विधानसभेला उमेदवार बदलाची चर्चा होती. त्यामुळे पोटनिवडणुकीप्रमाणे कसबा तसेच वरील तिन्ही मतदारसंघांत आपले उमेदवार विजयी होतील, असे सर्व्हे आपल्या बाजूने असल्याचे महाविकास आघाडीचे नेते निवडणुकीच्या आधीपासूनच सांगत होते.
मतदानानंतरही या भागांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे विजयाचे फलक लावण्यात आले. प्रत्यक्षात केवळ वडगाव शेरी वगळता इतरत्र भाजप- महायुतीच्या उमेदवारांनी विक्रमी मताधिक्याने निवडून येत सर्व अंदाज खोटे ठरविले आहेत. त्यामुळे आपल्या उमेदवाराचा पराभव कसा झाला? याचे गणितच उलगडत नसल्याचे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सांगत आहेत.
मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांना का निवडून दिले, हेच समजायला मार्ग नाही. नेमकी कोणती विकासकामे, शासनाच्या नेमक्या कोणत्या योजना राबविल्या? का जनसंपर्क वाढविला? कोणत्या आधारावर मतदान झाले, हे समोर येणे गरजेचे आहे.
– महेश पोकळे, महविकास आघाडी कार्यकर्ता
कसबा मतदारसंघात आम्ही दिवसरात्र काम केले. मतदारांचा प्रतिसादही प्रचंड होता. त्यामुळे आमचाच उमेदवार विजयी होणार, याची खात्री होती. मात्र, निकाल आम्हालाही धक्कादाक आहे. आता खचून न जाता आम्ही पुन्हा नव्या जोमाने लढण्यास सज्ज आहोत.
– परेश खांडके, महाविकास आघाडी कार्यकर्ता




