राहुल, प्रियांका यांच्या अटकेचा नगरमधील कार्यकर्त्यांकडून निषेध

नगर -हाथरस येथील पीडितेच्या परिवाराच्या भेटीसाठी चाललेल्या कॉंग्रेस नेते राहूल गांधी व प्रियांका गांधी यांच्याशी केलेल्या गैरवर्तणुकीचा नगरमधील कार्यकर्त्यांनी निषेध केला. पक्षाचे शहर-जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी नगरमध्ये रस्त्यावर उतरुन जेलभरो आंदोलन केले.
काळे यांच्यासह दीप चव्हाण, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आजू शेख, सोनू शेख, मोबीन शेख, गणेश आपरे, शरीफ सय्यद यांच्यासह कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. सहभागी कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. मोदी व योगी सरकारच्या निषेधाच्या घोषणा कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या.
काळे म्हणाले, “”योगी सरकारने केलेली ही कारवाई म्हणजे भारताच्या लोकशाहीतील काळा दिवस आहे. अशी हिटलरशाही वाढत गेली तर या देशांत सर्वसामान्य माणसाला जगणे मुश्कील होणार आहे.
बलात्कार पीडितेच्या परिवारासोबत संवाद महत्वाचा होता. या घटनेची सखोल चौकशी होत आवश्यक ती कारवाई व्हायलाच हवी. कॉंग्रेसच्या नेत्यांवर अशा प्रकारची कारवाई करून आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे.”





