वाई -लॉकडाऊनच्या काळात बेशिस्त वागणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करणत येणार आहे, अशी माहिती प्रांताधिकारी संगीता राजापूरकर चौगुले यांनी दिली. वाई आणि शहरालगत मोठ्या प्रमाणात करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे प्रांताधिकारी संगीता राजापूरकर चौगुले यांनी संपूर्ण वाई शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.
या काळात बेशिस्त वागणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश संगीता राजापूरकर यांनी दिल्याची माहिती वाई नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी दिली. नागरिकांची जीवनावश्यक वस्तू तसेच दैनंदिन गरजांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी नगरपालिकेने विविध समित्या स्थापन केलेल्या आहेत. प्रत्येक प्रभागासाठी त्या त्या प्रभागातील नगरसेवक, काही स्वयंसेवक आणि नगरपालिकेचे नियंत्रण अधिकारी यांची मिळून शहरा 10 प्रभाग स्तरीय समित्या केल्या आहेत.
प्रभागातील नगरसेवक समितीचे अध्यक्ष आहेत. वाई शहर प्रतिबंधित क्षेत्राच्या सर्व बाजूच्या रस्त्यांच्या सीमा पुढील आदेशापर्यंत सीलबंद ठेवण्यात येणार आहेत. सर्व आस्थापना, दुकाने, व्यवसाय पूर्णतः बंद राहणार आहेत. नगरपरिषदेच्या सर्व प्रभाग स्तरीय समित्यांनी प्रत्येक प्रभागामध्ये घरपोच सुविधेमार्फत दूध, किराणा माल, भाजीपाला, औषधे, खते, बी-बियाणे आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जाणार आहे. नागरिकांना यासंदर्भात कोणतीही अडचण भासल्यास त्यांनी आपापल्या प्रभाग समिती अध्यक्षांशी संपर्क साधावयाचा आहे.
याशिवाय नगरपरिषदेने प्रभागनिहाय शीघ्र प्रतिसाद पथके नेमलेली आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता कोणाही व्यक्तीला शहरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही तसेच शहरातून कोणालाही बाहेर सोडले जाणार नाही. इतर जिल्ह्यांतून किंवा परराज्यातून आलेल्या कोणाला विनापरवाना प्रवेश दिला जाणार नाही.